गडकरींनी तत्काळ राजीनामा द्यावा - यशवंत सिन्हा

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय पक्षाध्यक्ष नितीन गडकरींनी आपल्या पदाचा तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी केली आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Nov 20, 2012, 08:05 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय पक्षाध्यक्ष नितीन गडकरींनी आपल्या पदाचा तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी केली आहे.
दरम्यान, पक्षाने सिन्हा यांना इशारा दिला आहे की, पक्षातील कोणत्याही बाबींवर आणि नितीन गडकरींबाबत पक्ष स्तरावर चर्चा करावी. सार्वजनिक ठिकाणी याबाबत भाष्य करणे पक्षाच्या संस्कृतीत बसत नाही. सिन्हा यांनी आपले वक्तव्य मागे घ्यावे, असेही पक्षाचे प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे.

गडकरी यांच्यावर केजरीवाल यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यानुसार गडकरींवरील आरोप खरे आहेत की खोटे हे महत्त्वाचे नसून, सार्वजनिक जीवनात वावरताना तुमची प्रतिमा स्वच्छ असली पाहिजे. म्हणूनच भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदाचा त्यांनी तत्काळ राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी सिन्हा यांनी केली आहे.
काही दिवसापूर्वी भाजपचे खासदार राम जेठमलानी यांनीही गडकरी यांनी राजीनामा द्यावा, अशी उघड भूमिका घेतली होती. तसेच आपल्या या मताशी भाजपमधील ज्येष्ठ नेते जसवंतसिंग, यशवंत सिन्हा व शत्रुघ्न सिन्हा हे सहमत असल्याचा दावा केला होता. त्यातील यशवंत सिन्हा यांनी आता गडकरींविरोधात स्पष्ट आणि उघड भूमिका घेतली आहे. त्यामुळे नितीन गडकरी यांच्यावर आलेले संकट कायम असल्याचे दिसून येत आहे.