आता, मतदानानंतर पोचपावतीही मिळणार!

ईव्हीएम मशीनद्वारे मतदान केल्यानंतर आता नागरिकांना आपण केलेलं मत योग्य व्यक्तीलाच मिळालंय की नाही, याची खातरजमा करता येणार आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 9, 2013, 11:47 AM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, मुंबई
ईव्हीएम मशीनद्वारे मतदान केल्यानंतर आता नागरिकांना आपण केलेलं मत योग्य व्यक्तीलाच मिळालंय की नाही, याची खातरजमा करता येणार आहे. कारण, मतदान केल्यानंतर आता त्याची कागदी स्वरुपातील पोचपावती नागरिकांना मिळणार आहे.
आत्तापर्यंत ईव्हीएम मशीनद्वारे मतदान करताना बटण दाबल्यानंतर मत पडलं असं दर्शवण्यासाठी केवळ एक बेल वाजत होती. पण, अनेक उमेद्वारांनी आणि मतदान यंत्रातच फेरफार केल्याची तक्रारही अनेकदा नोंदवली होती. तसंच भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी प्रत्येक मतदाराला मतदान केल्यानंतर त्याची पोचपावती मिळावी आणि आपलं मत आपल्याला हव्या त्याच व्यक्तीला मिळालं याची त्याला खातरजमा करता यावी, यासाठी एक याचिका न्यायालयात दाखल केली होती.
सरन्यायाधीश पी. सथासिवम आणि न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या खंडपीठाने याप्रकरणी निकाल दिलाय. मतदानाची पोचपावती नागरिकांना मिळेल, अशी सोय करण्याचे आदेश न्यायालयानं निवडणूक आयोगाला दिलेत. सोबतच पोचपावती देण्यासाठी आवश्यक सुविधा उभारण्यासाठी केंद्र सरकारनं निवडणूक आयोगाला आर्थिक सहाय्य द्यावं, असे निर्देशही दिलेत.

याअगोदर, फेब्रुवारी २०१३ मध्ये झालेल्या नागालँड विधानसभा निवडणुकीत २१ मतदान केंद्रावर मतदारांना मतदानाची पोचपावती देण्याची यंत्रणा उभारून त्याची यशस्वी चाचणी घेण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाने न्यायालयाला दिली. यावर आर्थिक आणि प्रशासकीय कारणास्तव लोकसभा निवडणुकीसाठी टप्प्याटप्प्याने पोचपावती मशीनची (व्हीव्हीपीएटीएस) निवडणुकीत तरतूद करण्यात यईल, असं आयोगानं स्पष्ट केलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.