www.24taas.com,नवी दिल्ली
तिची झुंज संपली... आता सुरू होणार आहे तो अत्याचारांविरुद्धचा लढा. हा लढा अनेक पातळ्यांवर असणार आहे. तो कायद्याच्या पातळीवर महत्त्वाचा आहेच, पण समाजाची मानसिकताही बदलावी लागणार आहे. तिच्या मृत्यूनं एक नवा लढा सुरू केलाय.
सर्वपक्षीय नेते, सामाजिक संघटना, कायदेतज्ज्ञ आणि सर्व समाजाला एकदिलानं उभं रहावं लागेल... तरच हा लढा योग्य वेळेत आणि योग्य निर्णयासह संपेल. या सगळ्या ह्रदयद्रावक घटनेबद्दल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनीही चिंता व्यक्त केली आहे.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी अत्याचाराला बळी पडलेल्या मुलीला श्रद्धांजली वाहिली..तसंच माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी आता कडक कायदे बनवून न थांबता आता त्याची अंमलबजावणी करण्याची वेळ आल्याचं म्हटलंय. बलात्कार पीडित तरुणीच्या मृत्यूची दुर्दैवी सिंगापूरहून आली आणि सगळा देश हळहळला. एकाच वेळी शोक आणि संतापाची भावना उमटली. तिची झुंज अपयशी ठरल्याचं दुःख आणि ही अप्रिय घटना थांबवण्यात अपयश आलेल्या सरकारचा राग अशी मिश्र भावना देशभर आहे. या घटनेनं काही जुने प्रश्न नव्यानं समोर आणलेत तर काही नवे प्रश्नही निर्माण केलेत.
दिल्लीत क्रौर्य आणि अमानुषपणाची शिकार ठरलेली २३ वर्षीय तरुणी अखेर हे जग सोडून गेली. १६डिसेंबरच्या त्या काळरात्री बसमध्ये बलात्कार करून तिला मित्रासह चालत्या बसमधून फेकून देण्यापर्यंत त्या नराधमांची मजल गेली. अमानुषतेचा बळी ठरलेल्या त्या अभागी तरुणीनं तब्बल १३ दिवस मृत्यूशी झुंज दिली.
ती उपचारांना प्रतिसाद देत नसल्यानं अखेर तिला सिंगापूरच्या माऊंट एलिझाबेथ हॉस्पिटलच्या अद्ययावत आयसीयूमध्ये हलवण्यात आलं. अखेर २९तारखेच्या रात्री सव्वादोनच्या सुमारास तिची ही झुंज संपली. ही बातमी सकाळी देशभरात समजली आणि त्यानं प्रत्येक सहृद शोकसागरात बुडाला.
या दुःखाला किनार लाभली ती सरकारबाबत असलेल्या संतापाची. या संतापाचा उद्रेक देशभरात पहायला मिळाला. दिल्ली, मुंबईसह सर्व लहानमोठ्या शहरांमध्ये नागरिकांनी उत्फुर्तपणे मोर्चे काढले, शोकसभा घेतल्या. सुदैवानं दिवसभरात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.अशा घटनेचा संताप येणं स्वाभाविक आहे. पण हिंसाचारानं काहीच हाती लागणार नाही. मुलीचं जीवन संपवणाऱ्यांना कायदा योग्य ती शिक्षा देईलच. त्यासाठी जनतेनं कायदा हातात घेण्याची गरज नाही, झी २४ तासनं हे आवाहन देशवासियांना केलं होतं.