www.24taas.com, नवी दिल्ली
राहुल गांधी काँग्रेसचे ‘सचिन तेंडुलकर’ असल्याचं काँग्रेस नेते आणि परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांनी ‘झी न्यूज’शी बोलताना म्हटलंय. पक्षाकडून राहुल गांधींवर निवडणुकांसदर्भातली जबाबदारी सोपवण्यात आलीय. त्यानंतर आता काँग्रेस नेत्यांनी राहुल गांधींवर स्तुतीसुमनं उधळण्यास सुरुवात केलीय.
राहुल यांच्याकडे काँग्रेस पक्षात अखेर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेस समन्वय समितीचे ते अध्यक्ष असणार आहेत. या समितीत एकूण सहा सदस्य असणार आहेत. राहुल गांधी, दिग्विजय सिंह, मधूसुदन मिस्त्री, जयराम रमेश, अहमद पटेल आणि जनार्दन द्विवेदी या समितीमध्ये असतील. यावरच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शिद यांनी आनंद व्यक्त केलाय. ‘झी न्यूज’शी यासंदर्भात बोलताना ‘राहुल गांधी हे काँग्रेसचे सचिन तेंडुलकर आहेत आणि त्यांची चमक धुसर झालेली नाही. ना त्यांचा करिश्मा कमी पडलाय’ असं खुर्शिद यांनी म्हटलंय. राहुल गांधींवर ही जबाबदारी सोपवणं हे पक्षासाठी एक मोठं पाऊल होतं. ते नेहमीच पक्षाचा चेहरा ठरलेत, असंही खुर्शीद यांनी म्हटलंय.
राहुल गांधी यूपी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरलेत का? असा सवाल त्यांना विचारला गेला तेव्हा ते म्हणतात, ‘सचिन तेंडुलकर क्रिकेटमधला महान खेळाडू आहे मग काय तो कधी झीरोवर आऊट नाही झाला का? तो नेहमीच शतक ठोकतो का? सचिनसारखा खेळाडूही कधीकधी उत्तम खेळी खेळतो तर कधी कधी झीरोवर आऊट होतो... पण, याचा अर्थ हा नाही की तो महान खेळाडू नाही’. पुढे खुर्शीद म्हणतात, ‘राजनीती हाही एक खेळच आहे. या खेळातही कधी विजय होतो तर कधी पराजय. राहुल गांधी हे पहिल्यापासूनच पक्षाचा चेहरा राहिलेत. त्यांनी पक्षाचं नेतृत्व सांभाळावं अशी सगळ्यांचीच इच्छा आहे. नेतृत्व कसं सांभाळावं हे राहुल गांधींना चांगलंच माहित आहे. याचमुळे त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आलीय.’