झरदारी येणार, भारत-पाक मैत्री होणार?

भारतात येण्यापूर्वी पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी चर्चेत हाफीज सईदचे कोणतेही पडसाद उमटणार नसल्याचं म्हंटल आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग आणि झरदारी यांची भेट दोन्ही देशांमध्ये मैत्रीसंबध प्रस्थापित होण्याच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

Updated: Apr 8, 2012, 11:24 AM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

भारतात येण्यापूर्वी पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी चर्चेत हाफीज सईदचे कोणतेही पडसाद उमटणार नसल्याचं म्हंटल आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग आणि झरदारी यांची भेट दोन्ही देशांमध्ये मैत्रीसंबध प्रस्थापित होण्याच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

 

तब्बल ११ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना पुन्हा एकदा चांगल्या संबधांचे वेध लागले आहेत. आगऱ्यात जे काम अटलबिहारी वाजपेयी आणि जनरल परवेझ मुशर्रफ यांना जमलं नाही ते काम करण्याची जबाबदारी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि आसिफ अली झरदारी यांच्यावर येऊन ठेपली आहे. सध्या दोन्ही नेत्यांना देशांतर्गत समस्यांना तोंड द्यावं लागत आहे.

 

मात्र त्याबरोबर वाढता दहशतवाद हा देखील दोन्ही देशांसाठी चिंतेचा विषय ठरला आहे. दहशतवादी हाफिज सईद सध्या भारतासाठी डोकेदुखी असल्यानं सईदवर कारवाई करण्याच्या मागणीवर भारत आग्रही आहे. तर झरदारींनी मात्र हाफिज सईदच्या मुद्याचा चर्चेवर कोणताही परिणाम होणार नसल्याचं सांगून आधीच या मुद्याला बगल देण्याचा प्रयत्न केला आहे. दोन्ही नेत्यांच्या या भेटीत दहशतवादाबरोबर, सियाचीनमधून सैन्य मागे घेण्यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.

 

तसच तेल निर्यात, वीज आणि दोन्ही देशांमधील सलोखा वाढण्यासाठी क्रिकेट मॅचेस खेळवण्याच्या मुद्यांवरही चर्चा होणं अपेक्षित आहेत. झरदारी यांचा हा खाजगी दौरा असला तरी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि महासचिव राहुल गांधी यांच्या उपस्थितीमुळे या दौऱ्याला महत्व आल आहे. झरदारींचे सुपुत्र आणि पीपीपीचे अध्यक्ष बिलावल आणि राहुल गांधी या दोन युवा नेत्यांची भेटही महत्वपूर्ण मानली जाती आहे.

 

झरदारींच्या या भारत दौऱ्यात पाहुणचारात कुठेही कमतरता भासू नये याची सर्वतोपरी काळजी घेण्यात आली आहे. दोन्ही देशांमधील शत्रुत्व साऱ्या जगाला परिचित आहे. आजवर मित्रत्वासाठी अनेकदा प्रयत्न केले गेले पण त्याला हवं तसं यश मिळाल नाही. आता या दोन दिग्गजांच्या आजच्या भेटीतून काय निष्पन्न होतं याकडेच साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.