पाकच्या बडग्यासमोर अमेरिका नमली

नाटोने केलेल्या हवाई हल्ल्यात २४ पाक सैनिक मारले गेल्यानंतर पाकिस्तानी सरकारने अमेरिकेला हवाईतळ रिकामा करण्याचे आदेश दिले होते. अमेरिकन नागरिकांना परत नेण्यासाठी अमेरिकन विमान कडेकोट बंदोबस्तात शम्सी हवाई तळावर उतल्याचं वृत्त वाहिन्यांनी दिलं आहे.

Updated: Dec 4, 2011, 01:39 PM IST

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली

 

अमेरिकेने पाकिस्तानमधील शम्सी हवाई तळ रिकामा करण्यास सुरवात केली आहे. शम्सी हवाईतळाचा उपयोग अमेरिकन गुप्तचर संघटना सीआयए ड्रोण हल्ले चढवण्यासाठी करत असे. नाटोने केलेल्या हवाई हल्ल्यात २४ पाक सैनिक मारले गेल्यानंतर पाकिस्तानी सरकारने अमेरिकेला हवाईतळ रिकामा करण्याचे आदेश दिले होते. अमेरिकन नागरिकांना परत नेण्यासाठी अमेरिकन विमान कडेकोट बंदोबस्तात शम्सी हवाई तळावर उतल्याचं वृत्त वाहिन्यांनी दिलं आहे.

 

फेडरल इन्वेस्टिगेशन एजन्सीचे अधिकारी हवाई तळावर उपस्थित होते. अमेरिकन नागरिकांना तळाकडे नेण्यात येत असताना शम्सी हवाईतळाच्या जवळपास राहणाऱ्या रहिवाशांना घरातच राहण्याचे आणि बाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. बलोचिस्तानच्या दुर्गम भागात असलेला हवाई तळ पंधरा दिवसात रिकामा करण्याचे आदेश पाक सरकारने अमेरिकेला दिले होते. नाटोने २६ नोव्हेंबर रोजी पाकच्या दोन चौक्यांवर चढवलेल्या हल्ल्यात २४ पाकिस्तानी सैनिक मारले गेले होते त्याची तीव्र प्रतिक्रिया पाकिस्तानात उमटली होती. त्यानंतर अफगाणीस्तानला पाकिस्तानमार्गे जाणारा रसदीचा मार्ग पाक सरकारने बंद केला होता.

बलोचिस्तानची राजधानी क्वेट्टापासून शम्सी हवाईतळ ३०० किमी अंतरावर आहे. अमेरिका याच हवाई तळावरून पाकमधल्या दहशतवाद्यांविरुधच्या कारवाईत द्रोण हल्ले चढवत असे. पाकने १९९२ साली हा हवाई तळ संयुक्त अरब अमिरातीला भाडेपट्ट्यावर दिला होता आणि ९/११ च्या हल्ल्यानंतर अमेरिकेला हा हवाई तळ वापरण्यास देण्यात आला.