गर्भपाताचा कायदा आड; महिलेचा नाहक बळी

सध्या आयर्लंडमध्ये खळबळ उडालीय ती एका भारतीय वंशाच्या महिलेच्या मृत्यूमुळे... सविता नावाच्या महिलेचा मृत्यू आयरिश सरकारच्या एका अजब कायद्यामुळे झाल्याचा आरोप होतोय. वेळेवर गर्भपाताची परवानगी न मिळाल्यानं सविताचा अंत झाला. आयरिश सरकारनं या प्रकरणी चौकशीचे आदेश दिलेत.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Nov 16, 2012, 04:23 PM IST

www.24taas.com, डब्लिन
सध्या आयर्लंडमध्ये खळबळ उडालीय ती एका भारतीय वंशाच्या महिलेच्या मृत्यूमुळे... सविता नावाच्या महिलेचा मृत्यू आयरिश सरकारच्या एका अजब कायद्यामुळे झाल्याचा आरोप होतोय. वेळेवर गर्भपाताची परवानगी न मिळाल्यानं सविताचा अंत झाला. आयरिश सरकारनं या प्रकरणी चौकशीचे आदेश दिलेत.
काही दिवसांपूर्वीच सविताच्या घरी आनंद हलप्पनवार ओसंडून वहात होता. कारण घरात चिमुकला पाहुणा येणार होता. मात्र, आधी निसर्ग आणि नंतर निर्दयी कायद्यानं हा सगळा आनंद हिरावून घेतला. ३१ वर्षीय दंतचिकित्सक असलेली सविता १७ आठवड्यांची गर्भवती होती. मात्र, अचानक सुरु झालेल्या वेदनांमुळे तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. मिसकॅरेजच्या संशयावरून सविताच्या पतीनं डॉक्टरांकडे अबॉर्शनची मागणी केली. मात्र, इथं आयर्लंडमधील अजब कायदा आड आला आणि डॉक्टरांनी अबॉर्शनची मागणी फेटाळली. तीन दिवसांनंतर डॉक्टरांनी सविताचं ऑपरेशन करून तिला वाचवण्याचा प्रयत्न केला खरा मात्र तोपर्यंत फार वेळ झाला होता. सविताच्या शरीरात खोलवर विष पसरल्यानं तिचा दुर्दैवी अंत झाला.
सविताच्या मृत्यूमुळे आयर्लंडमध्ये खळबळ उडालीय. आयरिश सरकारनं या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत, अशी माहिती आयर्लंडचे आरोग्य मंत्री जेम्स रेली यांनी दिलीय. या प्रकरणाची दखल भारतातही घेतली जातेय. महिला संघटनांनी हा मुद्दा उचलून धरला असून विरोधी पक्षांनीही सरकारनं याप्रकरणी दखल घ्यावी, अशी मागणी केलीय. या घटनेनंतर अबॉर्शनचा कायदा चर्चेचा मुद्दा ठरलाय. आयर्लंडची राज्यघटना अबॉर्शनला परवानगी देत नाही. मात्र, तिथल्या सर्वोच्च न्यायालयानं १९९२ मध्ये एका सुनावणी दरम्यान मातेच्या आरोग्यास धोका असल्यास अबॉर्शनला परवानगी द्यावी, असं मत व्यक्त केलं होतं. आयरिश सरकारनं जर यावर विचार केला असता तर आज सविताचा नाहक बळी गेला नसता.