www.24taas.com, झी मीडिया, बोस्टन
भ्रष्टाचाराविरुद्ध रणशिंग फुंकणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे आपला यंदाचा स्वातंत्र्यदिवस न्यूयॉर्कमध्ये साजरा करणार आहेत. अमेरिकेत वसलेल्या मूळ भारतीयांनी अण्णांच्या स्वागताची जोरदार तयारी केलीय.
भारताचा स्वातंत्र्यदिन अर्थातच १५ ऑगस्टच्या दिवशी अण्णा हजारे न्यूयॉर्कमध्ये भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या परेडचं नेतृत्व करणार आहेत. ७६ वर्षीय अण्णांचा हा दोन आठवड्यांच्या अमेरिका दौरा असेल.
अण्णांना ज्या पद्धतीचा आदर आणि मान-सन्मान इथं दिला जातोय तो किंचितच एखाद्या राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना आजपर्यंत मिळालाय.
न्यूय़ॉर्कमध्ये साजरा होणाऱ्या भारताच्या स्वातंत्र्यदिनाचा सोहळ्याला रंगत आणणार आहेत ते अण्णा... त्यांना पाहण्यासाठी या ठिकाणी हजारोंच्या संख्येनं लोक दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. परेडचं नेतृत्व केल्यानंतर अण्णा नॉस्डॅकची घंटाही वाजवतील.
दक्षिण कॅरोलिनाचे गव्हर्नर आणि भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक निक्की हॅली यांच्यासोबत ‘डिनर’चाही अण्णांच्या या दौऱ्यातील कार्यक्रमात समावेश आहे. तसंच ते न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र मुख्यालयालाही भेट देतील... कॅपिटल हिलमध्ये संसद सदस्यांची भेट घेतील... सोबतच ते सॅन फॅन्सिस्को मेरीलँड, वॉर्टनमध्ये पेन्सिलेवेनिया विश्वविद्यालय तसंच कोलंबिया विश्वविद्यालयाच्या विद्यार्थींशीही संवाद साधणार आहेत.
केवळ भारतीयच नाही तर अमेरिकन नागरिकही अण्णा हजारे यांना पाहण्यासाठी-ऐकण्यासाठी उत्सुक आहेत. अमेरिकन मीडियाही या सोहळ्याच्या कव्हरेजसाठी सज्ज झालीय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.