www.24taas.com, झी मीडिया, लाहोर
1928 साली लाहोरमध्ये एका ब्रिटीश पोलीस अधिकाऱ्याच्या हत्या प्रकरणात नोंदविण्यात आलेल्या एफआयआरमध्ये पाकिस्तान पोलिसांना शहीद भगत सिंग यांचं नाव आढळलेलं नाही. त्यामुळे भगत सिंग यांना फाशी दिली गेल्यानंतर तब्बल 83 वर्षांनी या महान स्वातंत्र्यसेनानीचं निर्दोषत्व सिद्ध झाल्याचा, खुलासा पाकिस्तानकडून करण्यात आलाय.
ब्रिटीश अधिकारी सँडर्स याची 1928 साली काही अज्ञातांनी हत्या केली होती. याबद्दची एफआयआर 17 डिसेंबर 1928 रोजी सायंकाळी 4.30 वाजता नोंदविण्यात आली होती. या एफआयआरमध्ये, भगत सिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या नावाचा समावेश नाही, हे आता समोर आलंय. भगत सिंग यांना सँडर्सच्या हत्येप्रकरणी 1931 साली लाहोरच्या शादमान चौकात फाशी दिली गेली होती.
या प्रकरणाच्या मुळापर्यंत पोहचण्यासाठी भगत सिंग मेमोरिल फाऊंडेशनचे अध्यक्ष इम्तियाज राशिद कुरैशी यांनी एक याचिका दाखल केली होती. यामध्ये, तत्कालिन एसएसपी जॉन पी. सॅंडर्स याच्या हत्या प्रकरणात भगत सिंग, राजगुरु आणि सुखदेव यांच्या नावाचा समावेश असलेल्या एफआयआरची कॉपी प्राप्त व्हावी, अशी मागणी कुरैशी यांनी केली होती. सँडर्स हत्या प्रकरणात भगत सिंग निर्दोष आहेत, हे सिद्ध करण्यासाठी आपण ही याचिका दाखल केल्याचं कुरैशी यांनी म्हटलंय.
काय म्हटलं गेलंय एफआयआरमध्ये...
कुरैशी यांच्या या याचिकेवर लाहोर उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानंतर पोलिसांनी याच्या नोंदणी तपासल्या. अनारकली पोलीस स्टेशनमध्ये ऊर्दूमध्ये लिहिलेल्या या एफआयआरमध्ये दोन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचं समोर आलंय. याच पोलीस स्टेशनचा एका अधिकाऱ्यानं ही तक्रार नोंदविली होती. यावेळी, प्रत्यक्षदर्शी म्हणून त्यानं गुन्हेगाराचं वर्णन नोंदविताना, आपण पाठलाग केलेला गुन्हेगार 5 फूट 5 इंच उंच, हिंदू चेहरा, छोट्या मिशा आणि सडपातळ पण मजबूत शरीर असल्याचं म्हटलंय. तसंच त्यानं पांढऱ्या रंगाचा पायजमा, काळपट रंगाचं शर्ट आणि काळ्या रंगाची टोपी परिधान केली होती, असंही त्यानं यावेळी नोंदवलंय.
भगत सिंह यांचं निर्दोषत्वाचा हा एक पुरावाच आहे... सँडर्स हत्याप्रकरणात 450 साक्षीदारांना न ऐकताच भगत सिंग यांना फाशीची शिक्षा दिली गेली होती. भगत सिंग यांच्या वकिलांना उलटतपासणी करण्याची संधीही मिळाली नव्हती, असं यानंतर याचिकाकर्त्यांनी म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.