www.24taas.com, झी मीडिया, रंगून
धार्मिक अशांतीचं लोण म्यानमारमध्येही पसरलेलं आहे. म्यानमारमध्ये बौद्धांच्या एका संघाने मुस्लिम धर्मियांची घरं आणि दुकानं जाळली आहेत. शांततेच्या मार्गाने जीवन जगणाऱ्या बौद्ध धर्मियांकडून घजलेल्या या घटनेमुळे म्यानमारमध्ये खळबळ माजली आहे.
एका बौद्ध तरुणीवर मुस्लिम युवकाने बलात्कार झाल्याची बातमी पसरल्यामुळे बौद्धांच्या गटाने संतापून जाळपोळ सुरू केली. यामुळे बौद्ध आणि मुस्लिम धर्मियांमध्ये तेढ निर्माण झाली आहे. बलात्काऱ्याला आपल्या ताब्यात द्यावे, यासाठी बौद्ध संघटना आक्रमक झाल्या आहेत.
म्यानमारमधील कट्टरपंथी भिक्खू विरथू यांनी फेसबुक पेजवर यासंबंधात माहिती दिली आहे. या दंगलीत शेकडो लोकांचा सहभाग असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. विरथु यांच्या चिथावणीमुळेच चालू असलेल्या धार्मिक हिंसाचारात वाढ झाली आहे.
बलात्कार करणाऱ्या मुस्लिम आरोपीला पोलिसांनी अटक केलं होतं. या आरोपीला आमच्याकडे सोपवा अशी मागणी बौद्ध समुदायाने केली. मात्र पोलिसांनी नकार दिल्यामुळे संतापून बौद्धांनी मुस्लिम वस्त्यांमध्ये जाळपोळ सुरू केली. बौद्ध जमावाने सुमारे ३५ घरांना आग लावली हे, तसंच १२ दुकानं पेटवली आहेत. यातील बहुसंख्य मालमत्ता मुस्लिमांची आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.