अमेरिका पोलिसांची भारतीय वृद्धाला अमानूष मारहाण

अमेरिकेतील अल्बामा इथं राहणाऱ्या मुलाकडे गेलेल्या एका भारतीय वृद्धाला अमेरिकन पोलिसांनी अमानूष मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. सुरेशभाई पटेल असं या वृद्धाचं नाव असून या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले आहेत.  भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं याप्रकरणावर अमेरिकन दुतावासाकडून दाद मागितली आहे.  

Updated: Feb 12, 2015, 06:03 PM IST
अमेरिका पोलिसांची भारतीय वृद्धाला अमानूष मारहाण title=
57-year-old Sureshbhai Patel was partially paralysed in the US when a police officer forced him on ground. (Photo courtesy- al.com)

न्यू यॉर्क: अमेरिकेतील अल्बामा इथं राहणाऱ्या मुलाकडे गेलेल्या एका भारतीय वृद्धाला अमेरिकन पोलिसांनी अमानूष मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. सुरेशभाई पटेल असं या वृद्धाचं नाव असून या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले आहेत.  भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं याप्रकरणावर अमेरिकन दुतावासाकडून दाद मागितली आहे.  

गुजरातमध्ये राहणारे सुरेशभाई पटेल (वय ५७ वर्ष) हे दोन आठवड्यांपूर्वी अल्बामा इथं राहणाऱ्या मुलाकडे गेले आहेत. त्यांचा मुलगा चिराग पटेल हा नोकरीनिमित्त अल्बामा इथं असतो. 

गेल्या आठवड्यात सुरेशभाई पटेल हे घराबाहेरील रस्त्यावर फेरफटका मारत होते. या दरम्यान तिथं एक पोलीस अधिकारी आला आणि त्यानं सुरेशभाईंची चौकशी केली. सुरेशभाई यांना फारसे इंग्रजी येत नसले तरी त्यांनी इंग्रजी मुलाच्या घराचा क्रमांक सांगितला आणि तिथंच राहतो असं त्या अधिकाऱ्याला सांगितलं. मात्र या उत्तरावर त्याचं समाधान झालं नाही आणि त्यानं पटेल यांना जमिनीवर ढकलून दिलं. यानंतर त्यांना मारहाणही केली. या मारहाणीत पटेल हे गंभीर जखमी झाले असून या मारहाणीमुळं त्यांना पॅरेलिसीसही झालाय.

या मारहाणीविरोधात चिराग पटेल यांनी मेडीसन पोलिसांविरोधात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. कोणतंही कारण नसताना वृद्धाला मारहाण केल्याचं पटेल यांनी म्हटलं आहे. तर पटेल यांचे वकिल हॉंक शेरोड यांनी हे प्रकरण वर्णभेदाशी संबंधित असल्याचं सांगितलं. सुरेशभाई पटेल यांना इंग्रजी येत नसल्यानं परिस्थिती आणखी चिघळत गेली असंही शेरोड यांनी सांगितलं. 

तर आम्हाला एका अज्ञात व्यक्तीनं फोन करुन परिसरातील गॅरेजमध्ये संशयित व्यक्ती फिरत असल्याचं सांगितलं. यामुळंच पोलीस तिथं गेले होते असं प्रशासनानं स्पष्ट केलं. या मारहाणीवरुन वाद निर्माण होत असल्यानं पोलिसांनी संबंधित अधिकाऱ्याला तडकाफडकी निलंबितही केलं आहे. 

अमेरिकेतील पोलीस यंत्रणेवर गेल्या काही महिन्यांपासून वर्णभेदाचे आरोप होत आहेत. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पोलिसांनी निष्पाप कृष्णवर्णीय अमेरिकन तरुणाची हत्या केली होती. याविरोधात अमेरिकेतील अनेक भागांमध्ये निदर्शनंही झाली होती. यानंतर पोलिसांनी वर्णभेद सुरु ठेवणं दुर्दैवी आहे अशी प्रतिक्रिया स्थानिक समाजसेवी संस्थांनी दिली. याप्रकरणाचे पडसाद भारतातही उमटले असून भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं मेडीसन इथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून माहिती मागवली आहे.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.