आयर्लंडमध्येही वाचणार मातेचा जीव; होणार कायद्यात बदल

भारतीय वंशाच्या सविता हल्लपनवारच्या मृत्यूनंतर जगभरातून पडलेल्या दबावापुढे अखेर आयरलँड सरकारला झुकावं लागलंय. आईच्या जीवाला धोका असल्यास गर्भपाताला मंजुरी देण्याचा निर्णय आयर्लंडनं घेतलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 19, 2012, 04:52 PM IST

www.24taas.com, लंडन
भारतीय वंशाच्या सविता हल्लपनवारच्या मृत्यूनंतर जगभरातून पडलेल्या दबावापुढे अखेर आयरलँड सरकारला झुकावं लागलंय. आईच्या जीवाला धोका असल्यास गर्भपाताला मंजुरी देण्याचा निर्णय आयर्लंडनं घेतलाय.
गर्भपाताच्या कायद्याला परवानगी दिली जावी, अशा निर्णयाशी आयर्लंड सरकार येऊन ठेपलंय. गेल्या २८ ऑक्टोबर रोजी युनिव्हर्सिटी हॉस्पीटलमध्ये गर्भापात करण्यास डॉक्टरांनी नकार दिल्यानं भारतीय वंशाच्या सविताला आपला जीव गमवावा लागला होता. सविता १७ आठवड्यांची गर्भवती होती. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यानं ती मृत्यूशी झुंज देत होती. सविताच्या पतीनं सविताचा गर्भपात करण्याची डॉक्टरांकडे वारंवार विनंती केली. पण, या कॅथलिक देशात गर्भपाताचा कायदा नसल्यानं डॉक्टरांनी मात्र या विनंतीला साफ धुडकावून लावलं. गर्भात असलेल्या भ्रूणाच्या हृदयाचे ठोके चालू असल्याचं कारण डॉक्टरांनी यावेळी दिलं.
‘टेलिग्राफ’च्या वृत्तानुसार आयर्लंड सरकारनं गर्भापात हा गुन्हा असल्याचं नमूद करणाऱ्या कायद्यालाच तिलांजली द्यायचं ठरवलंय. त्याऐवजी एक नवीन कायदा लागू करण्याचा विचार सरकार करत आहे. या कायद्यानुसार आईच्या जीवाला धोका असल्यास डॉक्टर तिचा गर्भपात करू शकतील. आयर्लंडमध्ये गर्भवती महिलांना सुरक्षा पुरविण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे. त्यांच्या देखरेखीची संपूर्ण जबाबदारी आणि कर्तव्य आम्ही पार पाडू, असं आयर्लंडचे आरोग्यमंत्री डॉ. जेम्स रीली यांनी म्हटलंय.
या नव्या कायद्याचा मसुदा नव्या वर्षापर्यंत प्रकाशित होईल व इस्टरपर्यंत त्याचं कायद्यात रुपांतर केलं जाईल. गर्भपातासंबंधीच्या कायद्यासंदर्भात संपूर्ण युरोपमध्ये आयर्लंड हा कट्टर देश मानला जातो. कारण हा रोमन कॅथलिक देश आहे.