इस्लामाबाद: भारताचं शेजारी राष्ट्र पाकिस्तान वारंवार भारताबद्दल आणि पंतप्रधान मोदींबद्दल गरळ ओकतंय. 'नरेंद्र मोदींना अटक करून पाकिस्तानात आणणाऱ्याला मी १०० कोटींचं बक्षीस देईल', अशी मुक्ताफळं जमात -ए-इस्लामी संघटनेचा प्रमुख आणि पाकिस्तानच्या वरिष्ठ सभागृहाचा खासदार सिराज उल हकनं उधळली आहेत.
पाकव्याप्त काश्मीरमधील रावळकोट इथल्या एका कार्यक्रमात आपल्या समर्थकांना संबोधित करताना त्यानं हे वक्तव्य केलंय. मात्र त्यांच्या या वक्तव्यावरून त्यांच्याच देशातून विरोध सुरू झाला आहे.
'हिजबुल मुजाहिद्दीनचा प्रमुख आणि जिहादी नेता सय्यद सलाहुद्दीनवर बक्षीस जाहीर केल्यावरही भारताला त्याला अटक करण्यात यश मिळालं नसल्याचं त्यानं यावेळी सांगितलं. 'मी मोदींना सांगू इच्छितो की तुम्ही सलाउद्दीनला कधीच अटक करू शकणार नाही. तुम्ही म्हणता सलाउद्दीनला पकडणाऱ्याला ५० कोटींचं बक्षीस देऊ. तर जो कोणी मोदींना पकडून (पाकिस्तानात) आणेल त्याला मी १०० कोटींचा इनाम देईन' असं त्यानं म्हटलं.
हक यानं काश्मीरबाबतही वक्तव्य केलं आहे. ' भारत सरकार काश्मीरच्या स्वातंत्र्यातील सर्वात मोठी अडचण असून, भारत आणि पाकिस्तान कधीही मित्र बनू शकत नाहीत आणि जे अशा मैत्रीची चर्चा करतात त्यांनी सरळ भारतात निघून जावं, असंही सिराज म्हणाला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.