मुंबई : बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुतळा लंडनच्या प्रसिद्ध मादाम तुसाँ संग्रहालयात उभा राहणार असल्याची बातमी आली आणि मोदींच्या समर्थकांना आनंद झाला. आता मात्र मोदींसोबतच कपिल शर्माचा मेणाचा पुतळाही या संग्रहालयात उभा राहणार असल्याची बातमी आहे.
मोदींच्या शरीराची मापे घेण्यासाठी आलेल्या संग्रहालयाच्या टीमने कपिल शर्माच्या शरीराची मापे घेतानाचे काही फोटो आता इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. त्यावरुन हा अंदाज लावला जातोय. मुंबईच्या एका पंचतारांकित हॉटेलात हा कार्यक्रम पार पडला.
भारतीय टेलिव्हिजन कार्यक्रमातील कोणत्याही कलाकाराचा मेणाचा पुतळा मादाम तुसाँमध्ये साकारला जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे ही बाब कपिल आणि त्याच्या चाहत्यांसाठी अभिमानाचीच असेल. कपिलच्या प्रसिद्धीमुळेच त्याला हा बहुमान मिळालाय.
हा पुतळा तयार करण्यासाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी जाण्याची शक्यता आहे. आपल्या कार्यक्रमात मोदींनी उपस्थिती लावावी अशी कपिल शर्माची इच्छा आहे. मोदींनी त्यावर अजून तरी प्रतिक्रिया दिेलेली नाही. पण, पुतळ्याच्या माध्यमातून का होई ना आता ते एकत्र येणार आहे ही त्याच्यासाठी दिलासादायक बाब म्हणायला हवी.