`अल्ला... हा शब्द मुस्लिमांसाठी; इतरांनी तो वापरू नये`

‘अल्ला’ हा शब्द फक्त मुस्लिमांसाठीच आहे इतर धर्मियांना तो वापरता येणार नाही, असा धक्कादायक निकाल मलेशियातील एका कोर्टानं दिलाय. महत्त्वाचं म्हणजे, हा निकाल देणारे कोर्टाचे तीन जजही मुस्लिम धर्मीयच आहेत.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 15, 2013, 04:58 PM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, पुत्रजया (मलेशिया)
‘अल्ला’ हा शब्द फक्त मुस्लिमांसाठीच आहे इतर धर्मियांना तो वापरता येणार नाही, असा धक्कादायक निकाल मलेशियातील एका कोर्टानं दिलाय. महत्त्वाचं म्हणजे, हा निकाल देणारे कोर्टाचे तीन जजही मुस्लिम धर्मीयच आहेत.
यापूर्वी, मलिशियातल्या ‘द हेरॉल्ड’ या वृत्तपत्राला ‘अल्ला’ हा शब्द वापरण्याची परवानगी एका कनिष्ठ कोर्टानं 2009 साली दिली होती. हा निर्णय वरीष्ठ कोर्टात मात्र रद्दबादल ठरवण्यात आला. या निर्णयानुसार `अल्ला` हा शब्द `द हेराल्ड` वृत्तपत्राला वापरता येणार नाही. `अल्ला’ हा शब्द ख्रिश्चन धर्मियांच्या संस्कृतीचा भाग नसल्यानं या शब्दाच्या वापरामुळे मुस्लिम समुदायामध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे, असं मुख्य न्यायाधीश मोहम्मद अपांडी अली यांनी निकाल देताना म्हटलंय. कोर्टाबाहेर उभ्या असलेल्या अंदाजे २०० जणांच्या मुस्लिम जमावाने `अल्लाह अकबर` अशा घोषणा देत या निर्णयाचे जोरदार स्वागत केलं. `एक मुस्लिम म्हणून या निर्णयाचे स्वागत करायला हवं` अशी प्रतिक्रिया स्थानिक मुस्लिमांनी व्यक्त केलीय़
कोर्टाच्या या निर्णयाने या मुस्लिमबहुल देशा‌तील अन्य धर्मिय नागरिकांमध्ये मात्र कमालीची नाराजी पसरल्याचं चित्र उभं राहिलंय. यामुळे या देशात राहणाऱ्या अल्पसंख्याक समाजाचा प्रश्न ऐरणीवर आलाय.

महत्त्वाचं म्हणजे, मलेशियातील नजीब रझाक यांच्या सरकारवर स्थानिक संयुक्त मलय राष्ट्रीय संघटनेचा वरचष्मा आहे. येथील स्थानिक मलय हे कायद्याने मुस्लिम आहेत. रझाक यांच्या सरकारने अल्ला हा शब्द मुस्लिमांसाठीच असल्याची भूमिका घेत येथील स्थानिक ख्रिश्चन वर्तमानपत्राने तो वापरू नये, असा आदेश दिला होता. सरकारच्या या भूमिकेस आता कोर्टानेही पाठिंबा दिला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.