www.24taas.com, वृत्तसंस्था, बीजिंग
‘ऑल राइट, गुड नाइट’ असे शब्द व्हिएतनामच्या ‘हो ची मिन्ह’ इथल्या विमानतळ अधिकार्यांच्या कानावर पडले आणि काही क्षणांतच विमान रडारवरून नाहीसे झाले आणि अधिकार्यांची एकच धावपळ उडाली.
अखेरचा संदेश ‘गुड नाइट’चा होता पण ती रात्र २३९ प्रवाशांसाठी काळरात्र ठरली. विमान बीजिंगला पोहोचलेच नाही आणि जगभरात एकच खळबळ उडाली. सहा दिवसांपासून बेपत्ता झालेल्या या विमानाचा शोध घेण्यात दहाहून जास्त देश गुंतले आहेत. पण अद्याप काहीच ठावठिकाणा लागलेला नाही.
प्रवाशांचे नातेवाईक त्यांच्या आपल्या कुटुंबियांच्या वाटेकडे डोळे लावून बसले आहेत. काहीतरी चमत्कार घडेल आणि ते परत येतील अशी आशा नागरिकांना आहे.
मलेशियाचे एमएच ३७० हे सहा दिवसांपूर्वी बेपत्ता झाले. विमानात एकूण २३९ प्रवासी होते. यामध्ये पाच भारती नागरिकांसह २२७ प्रवासी आणि १२ कर्मचारी, चालक प्रवास करीत होते. १५३ चिनी प्रवासी होते. तसेच दोन प्रवासी चोरीच्या पासपोर्टवर प्रवास करीत होते. सहा दिवस झाले तरी विमानाचा ठावठिकाणा लावण्यात यश मिळत नसल्याने प्रवाशांचे नातेवाईक संतप्त झाले आहेत. त्यांच्या आग्रही मागणीखातर मलेशियन राजदूतांनी नागरिकांसह एक बैठक घेतली. या बैठकीमध्ये नागरिकांनी राजदूतांवर विविध प्रश्नांचा भडिमार केला. ही बैठक दोन तास सुरू होती पण बैठकीतून काहीच निष्पन्न झाले नाही.
विमानातील एक महिला प्रवासी चंद्रिका यांचे पती के. एस. नरेंद्रन यांनी मलेशियन सरकार खरी माहिती देत नाही, असा आरोप केला. पाच दिवसांपासून विमान बेपत्ता असल्याने प्रवाशांचे नातेवाईक दु:खात बुडाले आहेत.
अंदमानजवळ विमान शोधणार हिंदुस्थान
बेपत्ता विमानाच्या शोधासाठी भारतही सज्ज झाला असून अंदमान-निकोबार बेटाजवळ हे विमान कोसळले असल्याचा अंदाज भारतानं बांधला आहे. अंदमान समुद्र आणि मलाक्काच्या सामुद्रधुनीमधील भाग हा हिंदुस्थानी हवाई दलाच्या नियमित टेहळणीचा भाग असून इथं इतर देशांच्या नौदलाचे सरावही नियमित होत असतात. बेपत्ता विमान शोधण्यासाठी मलेशिया सरकारने हिंदुस्थानकडे साकडे घातले होते. त्यानंतर हिंदुस्थानने बेपत्ता विमान शोधण्याची तयारी दाखवली.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.