www.24taas.com, वृत्तसंस्था, बीजिंग
चिनी उपग्रहांनी बेपत्ता मलेशियन विमानाचे तीन तुकडे पाहिल्याचा दावा केला आहे. चीनच्या नागरी उड्डाण खात्याचे प्रमुख ली झियाझियांग यांनी मात्र उपग्रहांनी टिपलेले छायाचित्र विमानाचेच असल्याची खात्री नसल्याचं सांगितलं.
सात दिवसांपूर्वी कौलालंपूर इथून बीजिंगकडे निघालेलं विमान व्हिएतनामजवळच्या सामुद्रधुनीत बेपत्ता झालं. या विमानात २३९ प्रवासी होते. मलेशियन, भारतीय तसंच इतर देशांच्या नौदलानं जंगजंग पछाडूनही या विमानाचा थांगपत्ता लागला नाही. विमानात चीनचे जवळपास १५० प्रवासी होते. त्यामुळं चीननंही बेपत्ता विमानाचा युद्धस्तरावर शोध सुरू केला होता.
चिनी उपग्रहांनी रविवारी सकाळी दक्षिण चीन आणि व्हिएतनामच्यामध्ये असलेल्या खोल समुद्रात या विमानाच्या अवशेषाचे तीन तुकडे तरंगताना पाहिले. चीनचे पंतप्रधान ली क्विंग यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला. विमानाच्या शोधकामात आता समन्वयाची गरज असल्याचंही त्यांनी बोलून दाखवलं.
दक्षिण चीनचा समुद्र इतका मोठा आहे की इथं विमान शोधणं म्हणजे सागरातून सुई शोधून काढण्यासारखं आहे. त्यामुळंच हे विमान शोधणं कठीण झालंय. आता विमानाचा शोध हिंदी महासागरात घेणं सुरू झालंय. यासाठी भारत सरकारनं आपली जहाजं आणि विमान कामी लावले आहेत. चीनी उपग्रहांनी टिपलेले तुकडे हे त्याच विमानाचे आहे का? याचाही तपास केला जातोय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.