www.24taas.com, जॉर्जिया
‘जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती’ म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदल्या गेलेल्या बेसी कूपर यांचं निधन झालंय. मृत्यूसमयी त्यांचं वय होतं ११६ वर्ष...
पोटाचा त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अमेरिकेच्या जॉर्जिया राज्याच्या अटलांटा या राजधानीपासून पूर्वेस ४५ किमी अंतरावर असलेल्या मोन्रो या छोट्याश्या गावात राहणारी आपली आई शांतपणे मृत्यूस सामोरी गेली, असे बेसी यांचा मुलगा सिडने कूपर यांनी सांगितलंय. जणू काही माझी आई नीटनेटकी केशरचना करून मृत्यूला सामोरे जाण्यासाठी तयार झाली होती, असे सिडने म्हणाले. याच आठवड्यात बेसी यांचा अंत्यविधी होणार आहे. रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी त्यांनी आपले केस विंचरले आणि ख्रिसमसचा एक व्हिडिओ पाहिला. मात्र, त्यानंतर अचानक त्यांना श्वास घ्यायला त्रास जाणवू लागला होता.
बेसी कूपर यांचा जन्म टेनेस्सी राज्यात २६ ऑगस्ट १८९६ रोजी झाला व नंतर शिक्षक म्हणून नोकरी करण्यासाठी त्या पहिल्या महायुद्धाच्या काळात जॉर्जियामध्ये स्थलांतरित झाल्या. १९२४ मध्ये ल्युथर कूपर यांच्याशी त्यांचा विवाह झाला व त्यांच्यापासून त्यांना चार मुले झाली. बेसी ज्या वर्षी जन्मल्या त्याच वर्षी डाऊ जोन्सचा पहिला निर्देशांक प्रसिद्ध झाला, त्याच वर्षी पहिल्या आधुनिक ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या व फोर्डची पहिली मोटार कारखान्यातून बाहेर पडली यावरून त्यांनी आपल्या प्रदीर्घ आयुष्यात किती स्थित्यंतरे पाहिली याची कल्पना यावी. २०११ साली ‘जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती’ म्हणून त्यांची गिनीज बुकात नोंद करण्यात आली होती. त्यांच्या नावाची नोंद झाली होती.