इस्लामाबाद : शरबत गुला हिने खोट्या कागदपत्रांद्वारे पाकिस्तानचे नागरिकत्व मिळविले. तिसऱ्या जगातील मोनालिसा अर्थात हिरव्या डोळ्यांची अफगाणिस्तानची महिला अशी तिची ओळख आहे. शरबत हिला पाकिस्तानात अटक करण्यात आली.
खोट्या कागदपत्रांद्वारे पाकिस्तानचं नागरिकत्व मिळवल्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला आहे. शरबत गुलाकडे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान अशा दोन्ही देशांचे नागरिकत्व असल्याची ओळखपत्रे मिळाली आहेत. तिला पाकिस्तानातील नोथिया भागातून अटक करण्यात आली.
गुन्हा सिद्ध झाल्यास तिला 14 वर्षांपर्यंत तरुंगवास आणि 2 लाख रुपये दंड होऊ शकतो. नॅशनल जिओग्राफिक या जगप्रसिद्ध नियतकालिकाने 30 वर्षांपूर्वी आपल्या मुखपृष्ठावर शरबत गुलाचं छायाचित्र प्रकाशित केलं होते.
सोव्हिएत संघानं कब्जा केल्यानंतर अफगाणिस्तानातून पाकिस्तानात आलेल्या लाखो निर्वासितांची ओळख ठरलेली हिरव्या भेदक डोळ्यांमुळे मोनालिसा ऑफ अफगाणिस्तान म्हणून ती जगप्रसिद्ध झाली होती. स्टीव्ह मॅक्करी यांनी तिचं हे जगप्रसिद्ध छायाचित्र काढलं होते.