नवी दिल्ली : तुम्ही जर स्वतःला राष्ट्रभक्त मानत असाल तर ही बातमी तुमच्या पसंतीस पडणार नाही. कारण एका महत्त्वाच्या बाबतीत पाकिस्तान आणि बांगलादेशसारख्या देशांनी भारताला मागे टाकलंय. ही बाब म्हणजे जगातील आनंदी देशांचा निर्देशांक...
१५६ देशांच्या सर्वेक्षणानंतर पुढे आलेल्या आकड्यांनुसार जगात आनंदी देशांच्या निर्देशांकात भारत तब्बल ११८ व्या स्थानावर आहे. यात भारताचा क्रमांक पाकिस्तानच्याही मागे आहे. या यादीत भारताचे शेजारी देश पाकिस्तान ९२ व्या क्रमांकावर तर बांग्लादेश ११० व्या क्रमांकावर आहेत.
२०१३ साली भारत १११ व्या स्थानावर होता. तर गेल्या वर्षी भारत ११७ व्या स्थानावर होता. म्हणजेच भारतातील जनतेचा आनंद वर्षानुवर्षे ओसरत चालला आहे.
या यादीत डेन्मार्कने पहिलं स्थान पटकावलं आहे. गेल्या वर्षी या स्थानावर स्वित्झर्लंड हा देश होता. सर्वात धक्कादायक बाब, म्हणजे या यादीत सोमालिया (७६), चीन (८३), इराण (१०५), पॅलेस्टाइनचा भूभाग (१०८), आणि बांगलादेश (११०) यांसारखे देशसुद्धा भारताच्या पुढे आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या एका संस्थेद्वारे हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यात प्रत्येक देशात नागरिकांना मिळणाऱ्या सोयीसुविधा आणि देशातील संपत्तीचे असमान वाटप यांचे आकलन करण्यात आले आहे. या आधी दिलेल्या अहवालांत म्हटल्याप्रमाणे मानवी कल्याणासाठी नागरिकांचे उत्पन्न, शिक्षण, आरोग्य किंवा गरीबी यांपेक्षा देशांतील नागरिकांना असणारे समाधान जास्त महत्त्वाचे आहे.