वॉशिंग्टन : पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये भारताने सर्जिकल स्ट्राइक केल्यानंतर पाकिस्तान कोंडीत सापडला. पाकिस्तानातही विरोधकांसह नेटीझनची टीका सहन करावी लागली. त्यामुळे विचलीत झालेल्या पाकिस्तानने पुन्हा भारताला धमकी दिली आहे.
'सर्जिकल स्ट्राइक' आणि भारताच्या बदलत्या बलुचिस्तान नीतीमुळे बिथरलेल्या पाकिस्तानने पुन्हा थयथयाट सुरु केला आहे. 'भारतानं बलुचिस्तान प्रश्नात ढवळाढवळ केल्यास आम्हीही खलिस्तान, भारताच्या ईशान्य भागातील हिंसाचार आणि नक्षलवाद्यांचा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर उचलू, अशी धमकी पाकिस्तानने दिली आहे.
काश्मीरप्रश्नाबाबत अमेरिकेने मध्यस्थी करावी, असी पाकिस्तानने मागणी केली आहे. उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे. दहशतवादी कारवायांना पाठिंबा देण्याच्या पाकिस्तानच्या भूमिकेवर अमेरिकेनं उघड नाराजी व्यक्त केली होती.
काश्मीर प्रश्नात अमेरिकेने हस्तक्षेप करावा, अशी मागणी पाकचे विशेष दूत मुशाहिद हुसेन सय्यद आणि शेजरा मनसब यांनी गुरुवारी एका चर्चासत्रात बोलताना केली. अमेरिकेनं काश्मीरमध्ये लक्ष घालावं यासाठी सय्यद यांनी अफगाणिस्तानचा वापर करण्याचा इशारा दिला आहे.
भारत आणि अमेरिका या देशांनी अफगाणिस्तानच्या उभारणीसाठी प्रयत्न सुरु ठेवले आहेत. यावर पाकिस्तानने बोट दाखवलेय. काश्मीर प्रश्न सुटला तरच काबूलमध्ये शांतता राहू शकते. काश्मीरमध्ये धगधग ठेवायची आणि काबूलमध्ये शांततेसाठी प्रयत्न करायचे हे होऊ शकत नाही, असे पाकिस्तानचे म्हणणे आहे.
भारताने बलुचिस्तानबद्दल बोलणे थांबवले नाही तर आम्ही खलिस्तान, ईशान्येतील हिंसाचार आणि माओवाद्यांच्या बंडाचा मुद्दा उकरून काढू शकतो. आम्हाला तसं करायचं नाही. तो भारताचा अंतर्गत प्रश्न आहे. पण खेळाचे नियम बदलल्यास आम्हालाही जशास तसे उत्तर द्यावे लागेल, अशी फुशारकीही पाकिस्तानने मारली आहे.