www.24taas.com, इस्लामाबाद
पाकिस्तानात आणीबाणी लादल्याप्रकरणी माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांना शुक्रवारी अटक झाल्यानंतर इस्लामाबादेतील दहशतवाद विरोधी न्यायालयाने शनिवारी १५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणाची पुढील सुनावणी ४ मे रोजी होणार आहे.
२००७ मध्ये ६० न्यायाधीशांना अटक केल्याप्रकरणी मुशर्रफ यांच्याविरुद्ध खटला सुरू आहे. वेगवेगळ्या व्यक्तींनी मुशर्रफ यांच्याविरोधात याचिका दाखल केल्या आहेत. २००७ मध्ये आणीबाणी लादल्याप्रकरणी दहशतवादविरोधी न्यायालयाने पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. इस्लामाबादमधील फार्महाउसमधून पोलिसांनी मुशर्रफ यांना अटक केली होती. दहशतवादविरोधी न्यायालयाचे न्यायाधीश कौसर अब्बास झियादी यांच्यासमोर मुशर्रफ यांना हजर करण्यात आले. त्यावेळी हा निर्णय देण्यात आला.
पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांना अशा प्रकारच्या कारवाईला सामोरे जाणारे मुशर्रफ हे पाकिस्तानातील पहिले माजी लष्करप्रमुख आहेत. मुशर्रफ यांच्या वकिलांसह तक्रारदारांच्या वकिलांचे युक्तिवाद न्यायाधीशांनी ऐकले. त्यानंतर ४ मे रोजी मुशर्रफ यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. तक्रारदारांच्या वकिलांनी पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र, मुशर्रफ तपासामध्ये पोलिसांना सहकार्य करीत आहेत. त्यामुळे त्यांना पोलीस कोठडीऐवजी न्यायालयीन कोठडी द्यावी, असे मुशर्रफ यांचे वकील कमर अफजल यांनी न्यायालयात सांगितले.
न्यायालयाच्या परिसरात वकिलांच्या जमावाने मुशर्रफ यांच्याविरुद्ध घोषणाबाजी केली. मुशर्रफ यांचे समर्थकही न्यायालयाच्या परिसरात जमले होते. न्यायालयाचे कामकाज संपल्यानंतर त्यांना पुन्हा पोलीस मुख्यालयात नेण्यात आले. इस्लामाबाद प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव मुशर्रफ यांच्या फार्महाउसलाच तुरुंग म्हणून जाहीर करण्यात आले असून, त्याठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.