या आधीही 6 वेळा झाले सर्जिकल स्ट्राईक

पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या दहशतवादी तळांवर भारतीय लष्करानं सर्जिकल स्ट्राईक करून हे सगळे तळ उद्धव्स्त केले.

Updated: Sep 30, 2016, 08:06 PM IST
या आधीही 6 वेळा झाले सर्जिकल स्ट्राईक  title=

नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या दहशतवादी तळांवर भारतीय लष्करानं सर्जिकल स्ट्राईक करून हे सगळे तळ उद्धव्स्त केले. सर्जिकल स्ट्राईकची ही काही पहिली वेळ नाही. याआधीही सहा वेळा जगातल्या वेगवेगळ्या लष्करांनी सर्जिकल स्ट्राईकचा प्रयोग केला आहे.

1 म्यानमारमध्ये भारतीय लष्कराचं सर्जिकल ऑपरेशन

4 जून 2015 ला नागा दहशतवाद्यांनी चंदेल भागात भारतीय सैनिकांवर हल्ला केला होता. यामध्ये 18 भारतीय जवान शहीद झाले होते. याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराच्या 70 जवानांनी म्यानमारच्या जंगलामध्ये सर्जिकल ऑपरेशन केलं. 40 मिनीटं चाललेल्या या ऑपरेशनमध्ये 38 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला, तर 7 दहशतवादी गंभीर जखमी झाले.

2 लादेनला मारण्यासाठी अबोटाबादमध्ये अमेरिकेची कारवाई

अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला करणाऱ्या ओसामा बिन लादेनला ठार करण्यासाठी अमेरिकेनंही सर्जिकल ऑपरेशन केलं होतं. मे 2011मध्ये अमेरिकन लष्करानं पाकिस्तानच्या अबोटाबादमध्ये लपलेल्या लादेनला घुसून मारलं.

3 मोसादचं ऑपरेशन ब्लॅक सप्टेंबर

1972 साली ऑलिम्पिक खेळांच्यावेळी 11 इज्राईली नागरिकांना दहशतवाद्यांनी बंधक बनवलं होतं. या बदल्यात त्यांनी 234 फलस्त्यांना जेलमधून सोडण्याची मागणी केली होती. यानंतर इज्राईली सेनेनं गुप्तचर यंत्रणा मोसादच्या मदतीनं दहशतवाद्यांवर हल्ला केला.

या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी खेळाडूंवर गोळीबार केला. हेलिकॉप्टरलाही बॉम्बनं उडवलं आणि दुसऱ्या हेलिकॉप्टरमध्ये असलेल्या खेळाडूंवरही हल्ला केला. या हल्ल्यामध्ये सगळे दहशतवादी मारले गेले असले तरी इज्राईलच्या 9 खेळाडूंचा मृत्यू झाला.

या फलिस्तानी दहशतवाद्यांनी म्यूनिक ऑलिम्पिकवेळी 11 खेळाडूंना बंधक बनवून त्यांना ठार केलं. या आठही दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आलं होतं.

4 इज्राईली सेनेचं 'व्ह्रॅथ ऑफ गॉड'

इज्राईली सेनेनं त्यांची गुप्तचर यंत्रणा मोसादच्या मदतीनं ऑपरेशन ब्लॅक सप्टेंबरशी संबंधित असलेल्या सगळ्या दहशतवाद्यांना ठार करण्याची योजना आखली. या योजनेला व्ह्रॅथ ऑफ गॉड असं नाव देण्यात आलं. म्यूनिक हल्ल्यानंतर इज्राईली लष्करानं सीरिया आणि लेबनानमध्ये असलेल्या फलिस्तान लिबरेशन ऑर्गनायझेशनच्या दहा ठिकाणांवर बॉम्बनं हल्ले केले. यामध्ये 200 दहशतवादी आणि काही नागरिकांचा मृत्यू झाला.

5 खालीद शेख मोहम्मदच्या अटकेसाठी सर्जिकल ऑपरेशन

खालीद शेख मोहम्मद हा अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या हल्ल्यातील आरोपी होता. त्याला पकडण्यासाठी अमेरिकेच्या स्पेशल टास्क फोर्सनं पाकिस्तानच्या रावळपिंडीमध्ये सर्जिकल ऑपरेशन केलं. या ऑपरेशनवेळी सीआयएनं खालीद शेख मोहम्मदला अटक केली.

6 सोमालियामध्ये ब्लॅक डॉक डॉन

अमेरिकेच्या स्पेशल टास्क फोर्सनं 1993मध्ये सोमालियाच्या मोहम्मद फाराह एदिदला पकडण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक केला होता. अमेरिकेचा हा सर्जिकल स्ट्राईक अपयशी ठरला. यामध्ये अमेरिकेचे 18 सैनिक मारले गेले याबरोबरच दोन हेलिकॉप्टरही पाडण्यात आली. यामध्ये मोहम्मद फाराह एदिदला पळून जाण्यात यश मिळालं.