www.24taas.com, टोरांटो
कॅनडाची राजधानी टोरांटो इथं रंगलेल्या साहित्यिक मेळ्याची सांगता सोमवारी ‘काटकोन त्रिकोण’ या नाटकानं झाली. वसंत आबाजी डहाडे, प्रभा गणोरकर यांच्यासह आठ-दहा साहित्यिक आणि शेकडो साहित्यप्रेमींच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडला.
मेळाव्यासाठी जर एक ते दीड कोटी रुपये जमा होऊ शकतात, तर २५ लाखांच्या अनुदानासाठी सरकारकडे झोळी घेऊन जाण्याचं कारण काय? असा विचार यावेळी पुढे आला. संमेलनाच्या अध्यक्ष लीना देवधरे आणि डॉ. मोहन आगाशे उपस्थित होते. या संमेलनाला लागलेलं वादाचं गालबोट आणि साहित्य महामंडळानं संमेलनाकडे पाठ फिरवल्यानंतरही टोरांटोमधल्या मराठी भाषकांनी हा मेळावा यशस्वी करण्यासाठी जीवापाड मेहनत घेतल्याची प्रतिक्रीया संमेलनाच्या स्वागताध्यक्षा लीना देवधरे यांनी व्यक्त केली. संमेलनाला कोण आले, कोण नाही यापेक्षा संमेलन होणं आम्हाला अधिक महत्त्वाचं वाटल्याचं त्या म्हणाल्या.
तत्पूर्वी उद्घाटन कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेता डॉ. मोहन आगाशे यांनी साहित्य संमेलन हे केवळ हे फक्त साहित्यिकांचं नाही, तर साहित्य प्रेमींचंही असतं, असं मत मांडलं. स्थानिक बालकलाकारांनी सादर केलेला मराठी शाळा हा कार्यक्रम, तसंच मुलींचा आकाश पेलताना या नृत्य कार्यक्रमानं उपस्थितांची मनं जिंकली.