हेडन: हेडनच्या एका वॉलमार्टच्या शॉपमध्ये शॉपिंगसाठी गेलेल्या आई-मुलासोबत एक धक्कादायक प्रकार घडला. अवघ्या २ वर्षाच्या मुलानं आईच्या पर्समधून बंदुक काढली आणि चुकून ट्रिगर दबल्या गेलं. गोळी त्याच्या आईलाच लागली आणि तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळं परिसरात खळबळ माजलीय.
कोट्टेनाई कौंटी शरीफचे प्रवक्ते स्टू मिलर यांनी दिलेल्या माहितीनुसार, इदाहो इथल्या रहिवाशी असलेल्या व्हेरोनिका रेटलएज (वय 29) या आपल्या चार मुलांसह शॉपिंगसाठी गेल्या होत्या. त्यांच्याजवळ बंदुकीचा परवाना होता. व्हरोनिका इथं आपल्या नातवोईकांना भेटण्यासाठी आल्यानंतर त्या शॉपिंगसाठी मुलांना घेऊन वॉलमार्टमध्ये गेल्या होत्या. शॉपिंग झाल्यानंतर त्यांचा छोटा दोन वर्षांचा मुलगा पर्सजवळ पोहचला. त्यानं पर्समधून बंदूक बाहेर काढत एकदा गोळीबार केला. त्यानं मारलेली गोळी त्याच्या आईलाच लागल्यानं त्यांचा मृत्यू झाला.
व्हेरोनिका यांचे पती यावेळी मॉलमध्ये नव्हते. या सर्व घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांना धक्का बसला आहे. व्हेरोनिका यांच्या मुलांना त्यांच्या नातेवाईकांकडे ठेवण्यात आलं आहे. व्हेरोनिका ही मुलांची काळजी घेणारी आणि त्यांच्यावर खूप प्रेम करणारी आई होती, असं तिचे सासरे टेरी रेटलएज यांनी सांगितलं आहे.
वॉलमार्टचे प्रवक्ते ब्रुक बुकानन यांनीही ही घटना खूप वेदनादायक आणि धक्का पोहचवणारी असल्याचं म्हटलंय. या घटनेनंतर मॉल बुधवारपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.