`पाक भारतीय बोटींचा वापर कशासाठी करतं?`

भारतावर पुन्हा समुद्रमार्गे हल्ला होऊ शकतो. हल्ल्यासाठी कुबेरसारख्या बोटीचा वापर होऊ शकतो अशी भीती नौदलाचे पश्चिम विभागाचे प्रमुख व्हाईस अॅडमिरल शेखर सिन्हा यांनी व्यक्त केलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 4, 2012, 09:08 AM IST

www.24taas.com, मुंबई
भारतावर पुन्हा समुद्रमार्गे हल्ला होऊ शकतो. हल्ल्यासाठी कुबेरसारख्या बोटीचा वापर होऊ शकतो अशी भीती कोण्या मंत्र्यानं किंवा गुप्तचर विभागानं व्यक्त केली नसून नौदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख व्हाईस अॅडमिरल शेखर सिन्हा यांनी व्यक्त केली आहे.
भारतीय मच्छिमार चांगले मासे मिळावेत, यासाठी पाकिस्तानच्या समुद्रात प्रवेश करतात. तेव्हा पाकिस्तान नौदल या मच्छिमारांना ताब्यात घेतं. त्यांच्या नौकाही जप्त करते. काही कालावधीनंतर मच्छिमारांना सोडून देण्यात येतं. मात्र, यानंतरही पाक जप्त केलेल्या बोटी आपल्या ताब्यात ठेवत असल्याची धक्कादायक माहिती पश्चिम नौदल प्रमुखांनी दिलीय.
या बोटीचे काय केलं जातं? त्यांचा कशासाठी वापर केला जातो? याची माहिती नाही. मात्र, या बोटीचा वापर पुन्हा एकदा घुसखोरी करण्यासाठी, हल्ला करण्यासाठी केला जाण्याची भीती शेखर सिन्हा यांनी व्यक्त केलीय. नौदलदिनाच्या पूर्वसंध्येला ते पत्रकार परिषदेत बोलत होते.