www.24taas.com, नेपीतॉ, म्यानमार
भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज सकाळी म्यानमारच्या लोकशाही समर्थक नेत्या आँग सान स्यू की यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधानांनी सोनिया गांधी यांच्या वतीनं स्यू की यांना भारतभेटीचं आमंत्रण दिलंय. यावेळी, भारताशी असलेल्या घनिष्ठ संबंधांबाबत आपण समाधानी असल्याचं स्यू की यांनी म्हटलंय.
पंतप्रधान मनमोहन सिंग हे म्यानमारच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी त्यांनी स्यू की यांची भेट घेतलीय. ४५ मिनिटांच्या या भेटीनंतर स्यू की यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भारत आणि बर्मा अनेक वर्षांपासून सोबत आहेत. भारताच्या स्वातंत्र्याचं आंदोलन त्याचवेळी सुरू झालं होतं जेव्हा बर्मामध्येही स्वातंत्र्याचं आंदोलन छेडलं गेलं होतं. भविष्य काळात भारताशी होणाऱ्या घनिष्ठ संबंधांबाबतही आपण खुश आहोत, असं स्यू की यांनी यावेळी म्हटलंय.
आपणही भारतात येऊन जवाहरलाल नेहरू स्मृती व्याख्यानाला उपस्थित राहण्यासाठी उत्सुक असल्याचं त्यांनी सांगितलं. ‘नवी दिल्लीच्या श्रीराम महिला विद्यालयात शिक्षण घेतलेल्या स्यू की यांना भेटण्याची ही चांगली संधी होती’ असं पंतप्रधानांनी म्हटलंय. स्यू की यांनी आपल्या संघर्षमय जीवनातून लाखो लोकांना प्रेरणा दिलीय, असे गौरवोद्गार पंतप्रधानांनी यावेळी काढले.