हाँगकाँगमध्ये जन्म दिल्यास चीनी महिलांना दंड

चीनच्या नागरिकांनी हाँगकाँगमध्ये दुसऱ्या मुलाला जन्म दिला तर त्यांना चीनच्या एक मुलाच्या धोरणाचा भंग केल्याप्रकरणी दंड ठोठावण्यात येणार आहे.

Updated: Feb 7, 2012, 02:31 PM IST

www.24taas.com, हाँगकाँग

 

चीनच्या नागरिकांनी हाँगकाँगमध्ये दुसऱ्या मुलाला जन्म दिला तर त्यांना चीनच्या एक मुल सक्तीच्या धोरणाचा भंग केल्याप्रकरणी दंड ठोठावण्यात येणार आहे. चीनच्या प्रसार माध्यमांनी दिलेल्या वृत्तात चीनी महिला दुसऱ्या मुलाला जन्म देण्यासाठी हाँगकाँगला मोठ्या प्रमाणावर भेट देतात. चीनच्या एक मुल धोरणातून पळवाट काढण्यासाठी चीनी महिला मोठ्या संख्येने हाँगकाँगचा पर्याय निवडतात. त्यामुळेच हाँगकाँगमधील प्रसूतीगृह सप्टेंबरपर्यंत आरक्षित आहेत.

 

हाँगकाँगमध्ये मुलाला जन्म दिल्यास देशातील सर्वात धनाढ्य शहरात निवासाचे हक्कही प्राप्त होतात. हाँगकाँग ही ब्रिटीश वसाहत होती. चीनने १९७९ साली एक मुल धोरणाचा स्विकार केला. जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीनने लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी सक्तीने एक मुल धोरण राबवलं. गेल्या काही वर्षात मात्र हे नियम थोडे शिथिल करण्यात आले आहेत. गुआँगडोंग सरकारच्या वेबसाईटवर नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांना उत्पन्नाच्या सहापट दंड ठोठावण्यात येईल अशी नोटीस पोस्ट करण्यात आली आहे. गुआँगडोंक प्रांत हाँगकाँगच्या शेजारी आहे.

 

हाँगकाँगमध्य २०१० साली जन्मलेल्या ८८,५८४ बालकांपैकी चीनमधील महिलांनी जन्म दिलेल्या मुलांचे प्रमाण एक तृतियांश इतकं होतं. २००१ साली फ्कत ६२० बालकांना चीनमधील महिलांनी जन्म दिला होता.