अंधश्रद्धेचा कळस : प्रियांकाच्या मृत वडिलांच्या आज्ञेवरून 'कुंडी महायज्ञ'

'प्रियांका चोप्रा एक दिवस खासदार बनणार...' ही भविष्यवाणी आम्ही नाही तर एका ज्योतिषी महाभागानं केलीय. प्रियांकाच्या वडिलांनी स्वप्नात येऊन त्यांना दृष्टांत दिल्यानं हे महाशय प्रियांकाच्या सुखासाठी झगडतायत... तेही खुद्द प्रियांकानं या प्रकाराला नकार दिल्यानंतरही...  

Updated: Jan 21, 2015, 06:06 PM IST
अंधश्रद्धेचा कळस : प्रियांकाच्या मृत वडिलांच्या आज्ञेवरून 'कुंडी महायज्ञ' title=

नाशिक : 'प्रियांका चोप्रा एक दिवस खासदार बनणार...' ही भविष्यवाणी आम्ही नाही तर एका ज्योतिषी महाभागानं केलीय. प्रियांकाच्या वडिलांनी स्वप्नात येऊन त्यांना दृष्टांत दिल्यानं हे महाशय प्रियांकाच्या सुखासाठी झगडतायत... तेही खुद्द प्रियांकानं या प्रकाराला नकार दिल्यानंतरही...  

कायदा करूनही समाजात अंधश्रद्धेचे प्रकार खुलेआम सुरूच आहेत. नाशिकमध्ये एका ज्योतिषी महाभागानं सिनेअभिनेत्री प्रियांका चोप्राच्या सुखासाठी महायज्ञ सुरू केलाय... तो ही तिच्या मनाविरुद्ध... नाशिकच्या भद्रकाली देवी मंदिरात हा कुंडी महायज्ञ सुरू आहे. 'प्रियांकाला जीवनात यश मिळावं, पती आणि संततीसुख मिळावं' यासाठी हा उपद्व्याप सुरू आहे. प्रियांकाच्या दिवंगत पित्याच्या आत्म्याने आपल्याला हा आदेश दिल्याचा दावा रमल ज्योतिषी एस. बी. बोराळकर यांनी केलाय. प्रियांका चोप्रा खासदार बनेल, अशी भविष्यवाणीही या महामहीमांनी केलीय.

खेदाची बाब म्हणजे हे थोतांड रचून अंधश्रद्धा पसरवणारी ही व्यक्ती निवृत्त नायब तहसीलदार आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने यावर जोरदार आक्षेप घेतलाय. 

धक्कादायक म्हणजे, बोराळकर ज्योतिषी असे आणखी पाच यज्ञ करणार आहेत. त्यातला शेवटचा यज्ञ 31 मे 2015 रोजी प्रियांकाच्या घरासमोर करणार आहेत. 

विशेष म्हणजे आपल्या खासगी आयुष्यात ढवळाढवळ करू नका, नाहीतर पोलिसी कारवाईला सामोरं जावं लागेल असा सज्जड दम प्रियांकानं त्यांना भरल्याचं ते स्वतःच सांगतात.

सरकारनं अंधश्रद्धाविरोधी कायदा केला. जबाबदार माध्यम या नात्यानं अंधश्रद्धांवर जोरदार प्रहार करण्याचं काम 'झी 24 तास' सातत्यानं करतंय. अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्यकर्ते अंधश्रद्धेविरोधात आयुष्य वेचतायत... तरीही समाजातले हे भोंदूबाबा राजरोस आपली दुकानं थाटून बसलेत. ती केव्हा बंद होणार हा कळीचा प्रश्न आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.