दिग्दर्शक मधुर भांडारकर हत्येचा कट, अभिनेत्री प्रीती जैन दोषी

दिग्दर्शक मधुर भांडारकर याच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी अभिनेत्री प्रीती जैन आणि अन्य दोघांना न्यायालयाने दोषी ठरविले आहे. याप्रकरणी प्रितीला तीन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 28, 2017, 04:42 PM IST
दिग्दर्शक मधुर भांडारकर हत्येचा कट, अभिनेत्री प्रीती जैन दोषी  title=

मुंबई : दिग्दर्शक मधुर भांडारकर याच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी अभिनेत्री प्रीती जैन आणि अन्य दोघांना न्यायालयाने दोषी ठरविले आहे. याप्रकरणी प्रितीला तीन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

२००५ साली प्रीती जैन हिने मधुर भांडारकरला जीवे मारण्यासाठी सुपारी दिल्याचा आरोप होता. तिच्यावरील हा आरोप सिद्ध झाला आहे. यावेळी न्यायालयाने या प्रकरणातील अन्य दोन जणांची निर्दोष मुक्तताही केली.

सरकारी पक्षाच्या वकिलांनी केलेल्या दाव्यानुसार, प्रीती जैन हिने अरूण गवळीचा सहकारी नरेश परदेशी याला सप्टेंबर २००५ मध्ये मधुर भांडारकर याला जीवे मारण्यासाठी सुपारी दिली होती. वर्षभरापूर्वी तिने मधुर भांडारकर याने बलात्कार केल्याचाही आरोप केला होता. मात्र, या प्रकरणी न्यायालयाने मधुर भांडाकरला २०१२मध्ये निर्दोष मुक्त केले होते. 

प्रीती जैन हिने यासाठी नरेश परदेशीला ७५ हजार रूपयांची सुपारी दिली होती. मात्र, नरेशने कामगिरी पूर्ण न केल्यामुळे प्रीतीने त्याच्याकडे पैसे परत देण्यासाठी तगादा लावला होता. ही गोष्ट अरूण गवळीला समजल्यानंतर त्याने पोलिसांना याबाबत माहिती दिली होती आणि हे प्रकरण उघडकीस आले होते. त्यानंतर पोलिसांनी आठवडाभराच्या चौकशीनंतर १० सप्टेंबर २००५ रोजी प्रीती जैनविरोधात गुन्हा दाखल केला होता.