मुंबई : आमिर खान - अनुष्का शर्मा यांचा आगामी सिनेमा 'पीके' येत्या शुक्रवारी म्हणजे १९ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. याच सिनेमाचं एक खास स्क्रिनिंग आयोजित करण्यात आलं होतं... या स्क्रिनिंगसाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि 'मनसे' अध्यक्ष राज ठाकरे सहपरिवारासह उपस्थित होते.
यावेळी, खुद्द आमिर यजमानाच्या भूमिकेत होता. सचिन आणि आमिर एकमेकांच्या खूप जवळचे मित्र म्हणून ओळखले जातात. आमिरच्या 'सत्यमेव जयते' या कार्यक्रमातील एका भागातही सचिन यामुळे दिसला होता. 'पीके'च्या स्पेशल स्क्रिनिंगच्या निमित्तानं सचिन पत्नी अंजलीसोबत उपस्थित झाला होता.
तर, 'मनसे' अध्यक्ष राज ठाकरे आपल्या पक्षाच्या कामातून, बैठकांमधून आणि दौऱ्यांतून वेळ काढून या स्क्रिनिंगसाठी हजर झाले होते. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित आणि मुलगी उर्वशी हेदेखील उपस्थित होते. उर्वशीचा नुकताच एक अपघात झाला होता... यावेळी, तिच्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे, ती या स्क्रिनिंगसाठी वॉकिंग स्टीक घेऊन हजर झाली होती.
यावेळी, अभिनेत्री अनुष्का शर्मा, राजकुमार हिराणी, आमिरची पत्नी किरण राव, निर्माता साजिद नाडियादवाला, दिग्दर्शक अयान मुखर्जी, स्वदेस फेम अभिनेत्री गायत्री जोशी हेदेखील उपस्थित होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.