मुंबई : खेळ या विषयावर आजवर अनेक बॉलिवुड सिनेमे आपल्या भेटीला आले. कधी क्रिकेट, कधी हॉकी, तर कधी फुटबॉल. मात्र या वेळी बॉक्सिंगवर आधारित 'साला खडूस' या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. आर. माधवन आणि रितीका सिंग स्टारर 'साला खडूस' हा सिनेमा हा सिनेमा आज सिल्वर स्र्कीनवर झळकलाय.
आदी तोमर या बॉक्सरची ही कथा, जी भूमिका साकारली आहे अभिनेता आर माधवन यांनी. आदी तोमरवर त्याच्या चीफकडून अनेक आरोप करण्यात आलेत. याच दरम्यान आदीचं ट्रांसफर हरियाणावरुन चेन्नईला केलं जातं. आता आदीच्या आयुष्यात एक वेगळं ध्येय असतं. तो एका दमदार बॉक्सरचा शोधात असतो. तिथे त्याची भेट मासे विकणा-या मधीसोबत होते, जी व्यक्तिरेखा साकारली आहे अभिनेत्री रितीका सिंगनं. मधीला बॉक्सिंगची प्रचंड आवड आहे. लहानपणापासून टीव्हीवर मोहम्मद अली यांना पाहून बॉक्सिंगबद्दल प्रचंड ज्ञान तिनं मिळवलंय. रितीका आदीचं स्वप्न पूर्ण करणार का? यासाठी तुम्हाला 'साला खडूस' हा सिनेमा पाहावा लागेल.
एका कोच आणि त्याच्या शिष्याची ही गोष्ट आहे. प्रत्येक खेळावर आधारीत सिनेमाप्रमाणे या सिनेमातही या दोन पात्रांवरच जास्त लक्ष्य केंद्रीत करण्यात आलंय. याच बरोबर सिनेमात एक रोमॅन्टिक एंगल ही दिसून येतो..
सिनेमात रिअल लाईफ बॉक्सर रितीका सिंगनं आपली व्यक्तिरेखा चांगली बजावली आहे. 'साला खडूस' या सिनेमात ही अभिनेता आर. माधवननं पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची कमाल दाखवली आहे.
सिनेमातले हे सगळे फॅक्टर्स पाहता मी या सिनेमाला देतेय 3.5 स्टार्स.