मुंबई : आपला आगामी सिनेमा 'घायल वन्स अगेन' तयार झालाय खरा... पण, हा सिनेमा प्रेक्षकांसमोर यायलाही 'तारीख पे तारीख' घेतोय.
अगोदर हा सिनेमा १५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार होता परंतु, ही तारीख पुढे ढकलून ५ फेब्रुवारीवर गेली. या सिनेमाचं लिखाणचं काय तर दिग्दर्शनही स्वत: सनीनं केलंय. या सिनेमाच्या प्रमोशनसाठीही त्यानं कुठलीही कसर बाकी ठेवलेली नाही. पण, यामुळेच तो आर्थिक कचाट्यात सापडलाय.
आपल्या या दमदार अॅक्शन फिल्मसाठी त्यानं करोडो रुपये खर्च केलेत. 'टाईम्स ऑफ इंडिया'नं दिलेल्या माहितीनुसार, , या सिनेमासाठी पैसे जमवण्यासाठी सनीला आपला डबिंग आणि रेकॉर्डिंग स्टुडिओ 'सनी सुपर साऊंड' गहाण ठेवावा लागलाय. याच स्टुडिओत सनीचं ऑफिस, प्रिव्ह्यू थिएटर आणि दोन पोस्ट प्रोडक्शन सुइट आहेत.
'घायल वन्स अगेन' बनवण्यासाठी सनीला आर्थिक तडजोडी कराव्या लागत आहेत. त्यानं फायनान्सर्सकडून जे पैसे उधार घेतले होते ते परत करायचे होते त्यामुळेच त्यानं स्टुडिओ गहाण ठेवण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, सनीच्या मॅनेजरनं - सुनील सैनी यांनी मात्र या सगळ्या बातम्या चुकीच्या असल्याचं म्हटलंय.