लैंगिक संबंध आणि नकारात्मक विचार

विवाहाद्वारे लैंगिक संबंधांवर बंधने घालून घेऊन, दुसरीकडे तीच बंधने झुगारण्यासाठी नकळतपणे चोरवाटा, पळवाटांचा आधार माणूस का घेत राहतो?

Updated: Jun 5, 2013, 07:17 AM IST

www.24taas.com
विवाहाद्वारे लैंगिक संबंधांवर बंधने घालून घेऊन, दुसरीकडे तीच बंधने झुगारण्यासाठी नकळतपणे चोरवाटा, पळवाटांचा आधार माणूस का घेत राहतो? हे वास्तव बदलायचे कसे? भिन्नलिंगी आकर्षण, नंतर विवाह आणि मग त्यातून स्त्री-पुरुष जोडप्याला होणारे मूल ही चाकोरी मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग बनून गेलेली आहे. कधी एकेकाळी विवाह पद्धतीचा स्वीकार केल्यानंतर फक्त त्या चौकटीतल्या शरीरसंबंधाव्यतिरिक्त दोन व्यक्तींच्या शरीरसंबंधाच्या अन्य पद्धती मानवाला अनोळखी होऊन गेल्या. विवाहाद्वारे मान्यता मिळालेल्या आणि भिन्नलिंगी असणाऱ्या व्यक्तींनीच शरीरसंबंध करायचा आणि हा शरीरसंबंध म्हणजे संभोगच!
निसर्ग, पुनरुत्पत्तीसाठी, प्राणी शरीरांत हार्मोन्स निर्माण करून नर-मादींना एकत्र आणतो, हे खरं असलं तरी प्राण्यांमधील नर-मादी मात्र, अपत्य होऊ देण्याच्या जाणिवेने जवळ येत नसतात, हा मुद्दा महत्त्वाचा आहे. माणसाने बुद्धिसामर्थ्यांने विवाहाचा वापर हेतूत: अपत्य मिळवून देण्यासाठी केलेला असला तरीही स्त्री-पुरुषसुद्धा प्रत्येक वेळेस अपत्य होऊ देण्यासाठीच शरीरसंबंध करीत नाहीत, हेसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे.
स्त्रीचा जननकाळ संपल्यावरसुद्धा स्त्री व पुरुषांमध्ये आकर्षण असते आणि शरीरसंबंधाची इच्छाही असते. अर्थात या वयातील लैंगिक संबंधाचा आनंद हा मूल मिळविण्यासाठीचा नाही, हे स्पष्टच आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.