मुंबई : इंडिया टुडे ग्रुप आणि सिसेरो यांनी केलेल्या सर्व्हेनुसार महाराष्ट्रात भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येत असून दुसऱ्या स्थानावर शिवसेना राहणार असल्याचं दिसत आहे. तिसऱ्या स्थानावर राष्ट्रवादी आणि चौथ्या स्थानावर काँग्रेस फेकला गेला आहे.
इंडिया टूडेने केलेल्या सर्व्हेमध्ये भाजपला १३३ जागा मिळण्याचा अंदाज आहे. या सर्व्हेनुसार यात वाढ झाल्यास या जागा १४१ तर कमी झाल्यास १२५ जागांपर्यंत समाधान मानावे लागले. गेल्या निवडणुकीत भाजपला ४६ जागा मिळाल्या होत्या. पण या निवडणुकीत ८७ जागांचा फायदा दाखविला आहे.
सोशल मीडियात आघाडी घेतलेल्या शिवसेनेच्या पारड्यात केवळ ५७ जागा या सर्वेने टाकल्या आहेत. गेल्या निवडणुकीत शिवसेनेला ४४ जागा मिळाल्या होत्या. त्यात केवळ १३ जागा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या सर्वेनुसार शिवसेनेला जास्तीत जास्त ६३ जागा तर कमीत कमी ५१ जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
इतर सर्वेमध्ये राष्ट्रवादी चौथ्या स्थानावर दाखवण्यात आले पण इंडिया टुडेच्या सर्वेत ३३ जागांसह राष्ट्रवादी तिसऱ्या स्थावर राहणार अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीला ६२ जागा मिळाल्या होत्या. पण आता २९ जागांचा तोटा या सर्वेत दाखविला आहे. राष्ट्रवादीला जास्तीत जास्त ३८ आणि कमीत कमी २८ जागा मिळतील असे सांगितले आहे.
गेल्या निवडणुकीत ८२ जागांसह पहिल्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या काँग्रेसला या सर्वेत जबरदस्त दणका दिला आहे. तब्बल ५२ जागांची नुकसानीसह सर्वेत केवळ ३० जागा देण्यात आल्या आहेत. आघाडी तुटल्याचा सर्वाधिक तोटा काँग्रेसला झाल्याचे यात दाखविण्यात आले आहे. काँग्रेसला जास्तीत जास्त ३५ आणि कमीत कमी २५ जागा मिळतील असा अंदाज आहे.
सत्ता माझ्या हातात द्या असे सांगणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पक्षाला या सर्वेत केवळ १० जागा दाखविल्या आहेत. गेल्या निवडणुकीत मनसेला १३ जागा मिळाल्या होत्या. सर्वेनुसार मनसेला कमीत कमी 7 जागा तर जास्तीत जास्त 13 जागा मिळतील असा अंदाज आहे.
इंडिया टुडे ग्रुप आणि सिसेरोने केलेल्या सर्व्हेमध्ये अपक्ष उमेदवार 25 जागांवर यश मिळवतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर कमीत कमी 20 जागा तर जास्तीत जास्त 30 जागा मिळवतील असा अंदाज आहे.
पक्ष |
जागा |
भाजप |
१३३ (१२४-१३१) |
शिवसेना |
५७ (५१-६३) |
राष्ट्रवादी |
३३ (२८-३८) |
काँग्रेस |
३० (२५-३५) |
मनसे |
१० (७-१३) |
अपक्ष-इतर |
२५ (२०-३०) |
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.