पृथ्वीराज चव्हाणांवर काँग्रेसची भिस्त

 यंदाच्या निवडणुकीत कुणाची प्रतिष्ठा सर्वाधिक पणाला लागली असेल तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची... 15 वर्षांचं आघाडीचं सरकार पुन्हा सत्तेवर आणायचं आणि काँग्रेसमधील विरोधकांवर मात करत, पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळवायचं, अशी अडथळ्यांची शर्यत त्यांना पार करायचीय... यंदा जाहिरातीत काँग्रेसने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या स्वच्छ प्रतिमेचा वापर केलेला दिसतो आहे. काँग्रेसला जे काही यश मिळेल ते पृथ्वीबाबांच्या इमेजमुळेच.... 

Updated: Oct 1, 2014, 09:41 PM IST
पृथ्वीराज चव्हाणांवर काँग्रेसची भिस्त  title=

मुंबई : यंदाच्या निवडणुकीत कुणाची प्रतिष्ठा सर्वाधिक पणाला लागली असेल तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची... 15 वर्षांचं आघाडीचं सरकार पुन्हा सत्तेवर आणायचं आणि काँग्रेसमधील विरोधकांवर मात करत, पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळवायचं, अशी अडथळ्यांची शर्यत त्यांना पार करायचीय... यंदा जाहिरातीत काँग्रेसने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या स्वच्छ प्रतिमेचा वापर केलेला दिसतो आहे. काँग्रेसला जे काही यश मिळेल ते पृथ्वीबाबांच्या इमेजमुळेच.... 

चव्हाणांची गादी
यशवंतराव चव्हाण ते पृथ्वीराज चव्हाण... गेल्या 54 वर्षांतील महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा हा राजकीय प्रवास... महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे कराडचे सुपुत्र... आणि विद्यमान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे देखील कराडचेच... आदर्श घोटाळा प्रकरणात अशोक चव्हाण यांचं नाव आलं आणि त्यांना मुख्यमंत्रीपदावर पाणी सोडावं लागलं... अशोक चव्हाणांची विकेट पडल्यानंतर त्यांच्या जागी आले ते चव्हाणच... 11 नोव्हेंबर 2010 रोजी पृथ्वीराज चव्हाणांनी महाराष्ट्राचे 22 वे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला... केंद्रामध्ये पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री असलेल्या पृथ्वीबाबांना काँग्रेस हायकमांडच्या आदेशानं महाराष्ट्रात धाडण्यात आलं. त्यावेळी त्यांचा एकच प्लस पॉईंट होता तो म्हणजे त्यांचे स्वच्छ चारित्र्य... आणि गांधी घराण्याशी असलेली निष्ठा...
 
राजकारणाचे बाळकडू
 पृथ्वीबाबांचे आईवडिल दोघंही काँग्रेसचे खंदे कार्यकर्ते... आनंदराव चव्हाण आणि प्रेमलाताई चव्हाण यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. बिट्स पिलानी इथून बीई ऑनर्सची पदवी घेतल्यानंतर, उच्च शिक्षणासाठी ते अमेरिकेच्या कॅलिफोर्निया विद्यापीठात गेले. एमएसची पदवी घेतल्यानंतर एरोनॉटिकल क्षेत्रात त्यांनी काही काळ नोकरी केली. भारतात परतल्यानंतर तत्कालिन पंतप्रधान राजीव गांधी यांच्याशी त्यांची गट्टी जमली. राजीव गांधींच्याच आग्रहातर त्यांनी सक्रीय राजकारणात प्रवेश केला.
 
1991 मध्ये ते कराडमधून थेट खासदारच झाले. तेव्हापासून ते कायम दिल्लीच्या राजकारणातच रमले. लागोपाठ 1991, 1996 आणि 1998 अशी कराडमधून त्यांनी खासदारकीची हॅटट्रिक केली. पण 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर झालेल्या निवडणुकीत श्रीनिवास पाटील यांच्याकडून त्यांना पराभूत व्हावं लागलं. 2002 मध्ये काँग्रेसनं त्यांना राज्यसभा खासदार केलं. एप्रिल 2004 पासून ते पंतप्रधान कार्यालय, विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे राज्यमंत्री बनले, ते 2010 मध्ये महाराष्ट्रात परतेपर्यंत... मुख्यमंत्री झाल्यानंतर विधानसभेवर निवडून येण्याऐवजी पृथ्वीबाबांनी मागच्या दारानं विधान परिषदेत प्रवेश केला. 30 एप्रिल 2011 मध्ये ते विधान परिषदेचे आमदार झाले...

'मि. क्लिन' मुख्यमंत्री
 एक कडक शिस्तीचे मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीबाबांनी कारभार केला. स्वच्छ प्रतिमा ही त्यांची जमेची बाजू. विशेषतः उपमुख्यमंत्री अजित पवारांपासून अनेक मंत्र्यांवर विविध घोटाळ्यांमध्ये अडकल्याचे आरोप होत असताना, 'मि. क्लिन' पृथ्वीबाबांनी मात्र आपल्या कपड्यांवर एकही डाग पडू दिला नव्हता. बिल्डर लॉबीसाठी मुख्यमंत्री कार्यालयाचे आणि वर्षा बंगल्याचे दरवाजे बंद केले. ज्या फायलींवर आक्षेप होता, त्यावर स्वाक्षरी करण्यास ठाम नकार दिला. त्यातून पृथ्वीबाबांवर आरोप झाले. अगदी शरद पवारांनीही मुख्यमंत्र्यांच्या हाताला लकवा मारला आहे की काय, अशी तोफ डागली.

संथ कारभारामुळे पृथ्वीराज सरकार टीकेचे धनी बनले. त्याचे परिणाम लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला भोगावे लागले. लोकसभेला 48 पैकी काँग्रेसचे अवघे 2 तर राष्ट्रवादीचे केवळ 4 खासदार निवडून आले. त्याचे खापर पृथ्वीराजांवर फोडण्यात आलं. राष्ट्रवादीनं आणि काँग्रेसमधल्या असंतुष्टांनी त्यांच्याविरोधात उचल घेतली. मात्र हायकमांडचा वरदहस्त कायम असल्यानं त्यांची खुर्ची वाचली. लोकसभा पराभवाची ठेच लागल्यानंतर मात्र पृथ्वीराज सरकारनं कात टाकली. गेल्या चार महिन्यात झपाट्यानं निर्णय होऊ लागले. आठवड्यातून दोनवेळा कॅबिनेटच्या बैठका घेऊन, निर्णयांचा सपाटाच पृथ्वीबाबांनी लावला. पृथ्वी मिसाईल सुसाट वेगात सुटलं. एवढं की, रात्रीचा दिवस करून मंत्रालयातल्या फायली क्लिअर करण्यात आल्या. निवडणुकांच्या तोंडावर क्लस्टर डेव्हलपमेंटसारखे कथित बिल्डरधार्जिणे निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतल्यानं, विरोधकांनी त्यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतले.

मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला

आता विधानसभेच्या निवडणुकांचं बिगूल वाजलंय... मुख्यमंत्री या नात्यानं टीम काँग्रेसचं नेतृत्व त्यांच्याकडे आहे. 15 वर्षांची आघाडीची सत्ता टिकवण्याचं आव्हान त्यांच्यापुढं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला नामोहरम करून, काँग्रेसच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी त्यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. कराड दक्षिण या पारंपारिक मतदारसंघातून ते निवडणूक लढणार आहे. मात्र वर्षानुवर्षे तिथून निवडून येणारे विलासकाका उंडाळकर हा मतदारसंघ मुख्यमंत्र्यांना सोडायला अजिबात तयार नव्हते. वेळप्रसंगी अपक्ष म्हणून बंडखोरी करण्याचा पवित्रा उंडाळकरांनी घेतला होता. त्यामुळं घरच्या धन्याला साधी ओसरी मिळू नये, अशी वेळ पृथ्वीराज चव्हाणांवर आली होती...

लोकसभेतला पराभव, राष्ट्रवादी नेत्यांची महत्त्वाकांक्षा, काँग्रेस पक्षांतर्गत धुसफूस आणि आघाडी सरकारच्या विरोधातली जनतेची नाराजी, अशा सर्वच आघाड्यांवर पृथ्वीराज चव्हाणांना अग्निदिव्याचा सामना करावा लागणार आहे. ही अडथळ्यांची शर्यत मुख्यमंत्र्यांना पार करावी लागणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.