ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - गंगाखेड

विस्थापितांना आव्हान देत सिताराम घनदाट यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत इथे विजयाची हॅटट्रिक साधली आहे. यशाचा गंगाखेड पॅटर्न...काय असतो याचा चमत्कार आमदार सिताराम घनदाट यांनी गंगाखेडमध्ये दाखवून दिलाय. चार दिवसांपूर्वी मतदारांना लुभावण्यासाठी पैसे वाटण्याच्या आरोपाखाली घटनाट यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना लगेचच जामीनही मिळाला.

Updated: Oct 7, 2014, 09:33 PM IST
 title=

परभणी : विस्थापितांना आव्हान देत सिताराम घनदाट यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत इथे विजयाची हॅटट्रिक साधली आहे. यशाचा गंगाखेड पॅटर्न...काय असतो याचा चमत्कार आमदार सिताराम घनदाट यांनी गंगाखेडमध्ये दाखवून दिलाय. चार दिवसांपूर्वी मतदारांना लुभावण्यासाठी पैसे वाटण्याच्या आरोपाखाली घटनाट यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना लगेचच जामीनही मिळाला.

विधानसभा निवडणूक 2014 चे उमेदवार - 
शिवसेना - डॉ. शिवाजी दळणार
काँग्रेस - हरीभाऊ शेळके
राष्ट्रवादी -मधुसूदन केंद्रे    
मनसे - बालाजी देसाई
अपक्ष - सिताराम घनदाट 

1990 पर्यंत शेकापचे वर्चस्व असलेल्या या मतदारसंघावर 1995 मध्ये मात्र शेकापचे उमेदवार ज्ञानोबा गायकवाड यांचा सिताराम घनदाट यांनी पराभव करत सगळ्यांनाच देधक्का दिला. 

त्यानंतर 1999 आणि 2009 च्या निवडणुकीतही यशाची ही घोडदौड कायम ठेवत घनदाट यांनी 18880 मताधिक्याने विजयाची हॅटट्रिक नोंदवली. त्यावेळी भाजपतमध्ये असलेले मधूसूधन केंद्रे आणि तत्कालीन आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री असलेले सुरेश वरपुडकर या दिग्गज नेत्यांना घनदाट यांनी जशास तसे उत्तर देत पराभूत केले. 

घनदाट पुन्हा एकदा आगामी निवडणुकीत असाच चमत्कार दाखवण्यासाठी सज्ज झालेत.

भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचा गंगाखेड मतदारसंघावर विशेष प्रभाव होता. त्यांना मानणारा मोठा वर्ग इथे आहे. म्हणून मुंडे घराण्याचे जावई असलेल्या मधूसूधन केंद्रेंचे इथे राजकीय वजन वाढले होते. 

मात्र, केंद्रेंनी ऐनवेळी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि गंगाखेडची सत्तेची गणितं फिरली. 

केंद्रे गटाला नगरपालिकेत सर्वाधिक जागा मिळूनही भाजप-काँग्रेस आणि घनदाट गट अशा युतीचा गंगाखेड पॅटर्न राबवत केंद्रेंना सत्तेपासून दूर ठेवण्यात आलं. केंद्रे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आता राष्ट्रवादीकडून इच्छूक आहेत.

लोकसभेच्या निवडणुकीत गंगाखेड मतदारसंघातून शिवसेनेच्या संजय जाधव यांना तब्बल 54 हजार मतांचे मताधिक्य मिळालेय. यात विद्यमान आमदार सिताराम घनदाट यांचे योगदान मोठे असल्याचं सांगण्यात येतंय.  

राजकारणाच्या या साठमारीत सर्वसामान्य माणूस मात्र विकासापासून वंचित आहे.
- बळीराजाच्या समस्यांकडे दुर्लक्ष
- डिग्रस बंधा-याचे अपूर्ण काम
- ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था
- राजकारण्यांचे हेवेदावे
- प्रशासकीय अधिका-यांचा मनमानी कारभार
यामुळे सर्वसामान्य जनता तीव्र नाराजी व्यक्त करताना दिसतेय.

मराठा, मुस्लिम, वंजारी, बंजारा, लिंगायत, धनगर अशा समाजाचं प्राबल्य असलेल्या गंगाखेडमध्ये आगामी विधानसभेची लढत विद्यमान आमदारांना कदाचित सोपी जाईलही मात्र सर्वसामान्य नागरिकांची वाढती नाराजी त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरू शकते.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.