ऑडिट विधानसभा मतदारसंघ - मुंब्रा-कळवा

 ठाण्यातील मुंब्रा-कळवा मतदारसंघ. राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड इथे विद्यमान आमदार आहेत. सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवत आहेत. तर खासदार ओवेसी यांनी आपला उमेदवार जाहीर केला आहे. त्यामुळे आव्हाड यांना आता तगडे आव्हान या मतदार संघात असणार आहे.

Updated: Oct 1, 2014, 06:48 PM IST
ऑडिट विधानसभा मतदारसंघ - मुंब्रा-कळवा  title=

ठाणे : ठाण्यातील मुंब्रा-कळवा मतदारसंघ. राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड इथे विद्यमान आमदार आहेत. सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवत आहेत. तर खासदार ओवेसी यांनी आपला उमेदवार जाहीर केला आहे. त्यामुळे आव्हाड यांना आता तगडे आव्हान या मतदार संघात असणार आहे.

ठाण्यातल्या या मुंब्रा-कळवा मतदार संघात राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्त्यांची नेटवर्क वापरत राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला बनवलाय. गेल्यावेळी चार विधानसभा मतदारसंघांपैकी आघाडीला विजय मिळालेला हा एकमेव मतदारसंघ आहे. 
 
२००९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्टवादी आणि शिवसेना अशी सरळ लढत झाली होती. या निवडणुकीत राष्टवादीच्या जितेंद्र आव्हाड यांनी बाजी मारली होती. आव्हाड यांना ६१५१० तर शिवसेनेच्या राजन कीने यांना ४५८२१ मते मिळाली होती. तर मनसेच्या प्रशांत पवार याना १५ हजार ११९ मते मिळाली होती. मतविभाजनाचा फायदा झालेल्या आव्हाड यांचा १५६८९ मताधिक्याने विजय झाला होता. आता परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला ही जागा वाचविणे कठिण जाणार आहे.

कोणती विकासकामे झालीत ?  
आव्हाड यांच्या पाच वर्षातल्या विकासकामांबाबत बोलायचं झालं तर स्टेशन परिसरात वायफाय सेवा सुरु केली. कळव्यात शासकीय इमारतीची उभारणीसाठी प्रयत्न, कळव्यात नाट्यगृहाची सोय , मुंब्रयात भाजी मार्केट , मिनी स्टेडीयम, विटावा ठाणे स्टेशन पुलाची उभारणी अशी विविध विकासकामे मार्गी लावल्याने पुन्हा विजय आपलाच असल्याचा दावा आव्हाड यांनी केला आहे. 
 
कामांबाबत आव्हाडांची पोस्टरबाजी - विरोधक
आव्हाडांनी फक्त पोस्टरबाजी केली. विकासकामे केलीच नाहीत, इतरांनी केलेल्या कामाचं श्रेय लाटण्यातच त्यांचा पुढाकार असतो, असा आरोप विरोधक करत आहेत. मागच्यावेळी  शिवसेनेच्या  तिकिटावर निवडणूक लडलेले राजन किणे आता काँग्रेसमध्ये गेलेत. तर राष्टवादीतून सेनेत आलेल्या दशरथ पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर एमआयएमचीही या निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे. तर सपाच्यावतीने आबू आझमी यांचे पुत्र फराहन आझमी याचं नाव पुढे आहे. मनसेच्यावतीने मागील निवडणुकीतील उमेदवार प्रशांत पवार यांच्यासह सुधीर बुबेरा, राजेश देशपांडे, महेश साळवी यांची नावं चर्चेत होती. मात्र, यावेळी महेश मोतीराम साळवी यांना उमेदवारी मिळाली आहे. एकूणच यावेळची निवडणूक दुरंगी सामना न होता अधिक रंगतदार ठरण्याची चिन्ह आहेत.  

काय आहेत येथे समस्या... 
अनधिकृत बधाकामांचा सुळसुळाट, दुर्घनाग्रस्त इमारतींकडे दुर्लक्ष, अनेक कामे रखडलेली आहेत.  अशा काही समस्यांमुळे विद्यमान आमदारांविषयी संमिश्र प्रतिक्रिया ऐकायला मिळतात. 

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्टवादीच्या आनंद परांजपे यांना या मतदारसंघातून १२ हजार मतांची आघाडी मिळाली होती. मात्र आगामी विधानसभेसाठी ज्या मुस्लिम व्होट बँकेकडे सर्वच राजकीय पक्षांच्या नजरा आहेत, तिची विभागणी होऊन कुणाला फटका बसतो हेच पाहाणे औत्सुक्याचे असणार आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.