ऑडिट औरंगाबाद पूर्वचं

 औरंगाबाद पूर्व या विधानसभा मतदारसंघाकडे अनेकांच्या नजरा लागलेल्या असतात. कारण इथे राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा चौथ्यांदा बाजी मारण्यासाठी सज्ज झालेत. तर दुसरीकडे मोदी लाटेचा फायदा उचलण्यासाठी भाजपही कामाला लागली आहे.

Updated: Oct 7, 2014, 09:36 PM IST
 title=

औरंगाबाद :  औरंगाबाद पूर्व या विधानसभा मतदारसंघाकडे अनेकांच्या नजरा लागलेल्या असतात. कारण इथे राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा चौथ्यांदा बाजी मारण्यासाठी सज्ज झालेत. तर दुसरीकडे मोदी लाटेचा फायदा उचलण्यासाठी भाजपही कामाला लागली आहे.

औरंगाबाद पूर्ण मतदारसंघाची ओळख २००४ नंतर नव्याने उदयास आली असली, तरी हा मतदारसंघ ओळखला जातो राज्याचे शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांचा मतदारसंघ म्हणून.

या मतदारसंघात पुर्नरचनेआधी आणि त्यानंतरही म्हणजे गेल्या 3 टर्मपासून राजेंद्र दर्डा यांनी अगदी सहज बाजी मारली आहे. 

एकूण मतदार संख्या 2 लाख 48 हजार 605 असलेल्या या मतदारसंघामध्ये मुस्लिम बहुल भाग अधिक आहे.

जवळपास 35 टक्के मतदार मुस्लिम आहेत, तर 40 टक्के हिंदू त्यातही माहेश्वरी आणि मारवाडी समाजाची संख्या उल्लेखनीय आहे.

मुस्लिम मतदार हा नेहमीच काँग्रेसच्या पाठिशी राहिल्यानं राजेंद्र दर्डा यांना सहज विजय मिळवता आलाय. 

2009 मध्ये दर्डा यांना ४८ हजार १९७ मते मिळाली तर त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी भाजपचे डॉ. भागवत कराड यांना ३२ हजार ९६५ मते मिळाली. 

येथे बंडखोर सुभाष झांबड यांना १७ हजार २७६ मते मिळाली होती.त्यातच सुभाष झांबड आता काँग्रेसवासी झाल्यानं दर्डांना विजयाची खात्री आहे. निवडणूकांसाठी दर्डा आता कामाला सुद्धा लागले आहे.

शहरात सगळीकडे त्यांनी स्वत:ची ब्रँडिंग सुद्धा सुरु केली आहे. त्यातच विकासाची भरीव काम केल्यानं मतदारराजा आपल्या पारड्यातच विजयाचा कौल टाकणार याची खात्री दर्डांना आहे.

औरंगाबाद शहरातील 3 मतदार संघापैकी दोन मतदार संघात शिवसेनेला यश मिळवता आलं असतं, मात्र भाजपच्या वाट्याला आलेल्या औरंगाबाद पूर्व मध्ये युतीला कधीच यश मिळालं नाही. याच कारण सांगितलं जातं ते दर्डा आणि खैरे यांची छुपीयुती, याची नेहमीच चर्चा असते.

या मतदारसंघातून भाजप अतुल सावे यांना उमेदवारी मिळाली आहे. 
 
तर भाकपचे नेते आणि अभ्यासू राजकारणी असलेले भालचंद्र काँगो सुद्धा औरंगाबाद पूर्वमधून यावेळेस निवडणूक लढवणार आहे त्याचा फटकाही दर्डांना बसू शकतो.

मुस्लिम मतांच्या जीवावर सहज विजय मिळवून देणा-या दर्डांना य़ा निवडणूकीत एमआयआमचे आव्हान सुद्धा असू शकते.

एमआयआमने उमेदवार उभा केल्यास मुस्लिम मतांचे विभाजन दर्डांना त्रासिक ठरू शकते. तर उत्तमसिंग पवारांची नाराजी सुद्धा दर्डाना महागात पडण्याची शक्यता आहे.
 
दर्डांचा जरी हा मतदारसंघ असला तरी अनेक समस्यांना इथल्या नागरिकांना सामोरं जावं लागतय.

मतदारसंघात रस्त्यांचा मोठा प्रश्न आहे. मोठ्या रस्त्यांना समांतर रोड नसल्याने ट्राफीक जामचा प्रचंड त्रास आहे.

पाणीपुरवठ्याची यंत्रणा नाही. यासाठी दर्डांनीही यासाठी काही केलं नसल्याचा आरोप नागरिक करतायत. मुलांना खेळण्यासाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी प्ले ग्राऊंड वॉकर्स झोनचे आश्वासनं देवूनही काम केलं नसल्याचा आरोप होतोय.

मतदारसंघात गुंठेवारीचाही मोठा प्रश्न आहे, तो सोडवण्यात अपयश आले आहे.

मतदारसंघातील नारेगाव कचरा डेपोचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. 

चिखलठाणा औद्योगिक वसाहत बंद पडायला आली मात्र मंत्रीमहोदयाचे लक्षच नाही, येथील जागा आता बिल्डर हडपताय..

एक ना अनेक कारणांनी स्थानिक मतदार सुद्धा दर्डांवर नाराज असल्याचंच चित्र आहे.

तर राजकीय विश्लेषकांच्या मते ही सगळी गणित असली तरी दर्डांचे पारडे जड असल्याचंच मत आहे.

औऱंगाबाद पूर्व मतदारसंघात काँग्रेस आणि भाजपची थेट लढत असणार आहे, त्यात 15 वर्ष मंत्री राहूनही मतदारसंघाचा म्हणावा तसा विकास झाला नाही हे सत्य आहे. त्यामुळे भाजप दर्डांचा गडाला सुरुंग लावणार की दर्डा गड राखणार याचीच उत्सुकता आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.