शाळेतल्या लिपिकाची ११ विद्यार्थिनींना बेदम मारहाण

वर्गात बडबड केली या कारणावरुन ११ मुलींना बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यात घडलीय. कडूस येथील माध्यमिक विद्यालयातील लिपीकाने हे अमानुष कृत्य केलंय.

Updated: Jul 16, 2015, 11:15 AM IST
शाळेतल्या लिपिकाची ११ विद्यार्थिनींना बेदम मारहाण title=
प्रातिनिधिक फोटो

अहमदनगर : वर्गात बडबड केली या कारणावरुन ११ मुलींना बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यात घडलीय. कडूस येथील माध्यमिक विद्यालयातील लिपीकाने हे अमानुष कृत्य केलंय.

अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यातील कडूस या गावात कडूस माध्यमिक विद्यालय असून ८ वी ते १० पर्यंतचं शिक्षण या शाळेत दिलं जातं. याच शाळेत सुनिल गायकवाड हा लिपीक असून तो शिक्षकाचंही काम करतो. शाळेतील ११ विद्यार्थिनींना सुनिल गायकवाड या लिपीकानं बेदम मारहाण केलीय. 

वर्गात बडबड केल्याचा राग धरुन सुनील गायकवाड या लिपीकानं आठवीच्या विद्यार्थीनींना अमानुष मारहाण केलीय. एका वर्गात कोंडून या विद्यार्थ्यानींना छडीनं बेदम मारहाण करण्यात आलीय. मारहाणीनंतर वर्गाच्या बाहेर पडल्यावर विद्यार्थिनींना अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळं नागरिकांनी त्यांना पारनेरच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल केलं. मात्र तीन विद्यार्थिनींची प्रकृती खालावल्यानं त्यांना नगरच्या जिल्हा रूग्णालयात हलवण्यात आलंय.

दरम्यान, या प्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात सुनिल गायकवाड याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सुनिल गायकवाड फरार आहे. कडुस गावातील नागरिकांनी देखील लिपीकावर कडक कारवाईची मागणी केलीय. या मारहाणीच्या निषेधार्थ गाव बंदचाही ईशारा नागरिकांनी दिलाय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.