नागपूर : सध्या सणासुदीचे दिवस असून महागाई गगनाला भिडली आहे. तूर डाळीच्या किंमतही गगनाला भिडत असताना, आता तूरडाळ चोरीचे प्रकारही होऊ लागलेत. नागपूरात तब्बल ३५० क्विंटल डाळ चोरीला गेली.
सध्याच्या बाजारभावा प्रमाणे या डाळीची किंमत २५ लाख इतकी आहे. या प्रकरणात कारवाई करत पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यांच्याकडून १८० क्विंटल तूर जप्त केली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून नागपूर बाहेरही पोलीस पथक पाठवण्यात आलंय. येत्या काही दिवसांत याप्रकरणातील आणखी काही आरोपी हाती लागण्याची शक्यता आहे.
अधिक वाचा : तुमच्या ताटातील तूरडाळीवर असा टाकला जातोय डाका
आफ्रिकेतून नागपुरात येणाऱ्या ३५२ क्विंटल तुरीच्या डाळीचा ट्रकच लंपास करण्यात आला आहे. ही चोरी दुसऱ्या-तिसऱ्या कोणीही केली नसून या डाळीची वाहतूकदार ट्रकमालक-चालकाने केल्याची खळबळजनक माहिती आहे.
अमिनेश अशोक अग्रवाल (३३,रा. देशपांडे लेआऊट, नंदनवन) यांचे कळमना बाजारात मेसर्स नागलमल अॅण्ड सन्स हे अन्नधान्याचे घाऊक दुकान आहे. या दुकानाकरिता एक महिन्यापूर्वी त्यांनी दक्षिण आफ्रिकेतून शेकडो क्विंटल तूर डाळीची ऑर्डर दिली होती. काही दिवसांपूर्वी त्यांची ही पोती मुंबईतील गोदीत जमा होती.
अमिनेश अग्रवाल यांनी या प्रकरणाची चौकशी केली असता मुंबईतील गोदीपर्यंत तूर डाळीची नोंदणी बरोबर आहे. त्यानंतर मुंबई-नागपूर प्रवासादरम्यान ट्रकमधून तूरडाळ लंपास करण्यात आल्याचे लाक्षात आल्याने अग्रवाल यांनी कळमना पोलिसात तक्रार दिली.
पोलिसांनी प्राथमिक चौकशी केल्यावर २४ ट्रक मालक व चालकांनी संगनमत करून २५ लाख ५९ हजार २७२ किमतीच्या ३५२ क्विंटल डाळीची चोरी केल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.