कैलास पुरी, पुणे : राज्य सरकारनं मोठा गाजावाजा करत सामन्यांना स्वस्तात रक्त पुरवठा करण्यासाठी योजना सुरु केली. पण या योजनेचा पुरता बोजवारा उडालाय. पुणे जिल्ह्यात तर ही योजना सुरु आहे की नाही अशी शंका उपस्थित होतेय.
'तुम्हाला रक्ताची गरज असेल तर १०४ क्रमांकावर फोन करा आणि तत्काळ रक्त मिळवा' असा गाजावाजा करत राज्य सरकारने गेल्या वर्षी योजना सुरू केली. पण वास्तवात योजनेचा पुरता बोजवारा उडालाय.
पुणे जिल्ह्यात रूग्णांना औंध इथल्या पुणे जिल्हा रूग्णालयातल्या रक्त पेढीतून रक्त पुरवलं जातं. पण इथे अत्याधुनिक सुविधाच नसल्याने फक्त संपूर्ण रक्तच मिळतं. प्लेटलेट्स, प्लास्मा असे घटक मिळतच नाहीत. त्यासाठी खासगी रक्तपेढीचाच आधार घ्यावा लागतो. योजना सुरू झाल्यापासून इथे ६१७ जणांनी रक्तासाठी फोन केला. पण फक्त १०९ जणांनाच रक्ताचा पुरवठा करणं शक्य झालं.
धक्कादायक बाब म्हणजे, योजनेचं कॉल सेंटर फक्त औंध रूग्णालयातच आहे. ते चालवण्याची जबाबदारी खासगी संस्थेकडे आहे. त्यामुळे राज्यातली आकडेवारी देण्यास ते तयार नाहीत.
पुणे जिल्ह्यात ही स्थिती असेल तर राज्यातल्या इतर जिल्ह्यातली स्थिती काय असेल याचा विचार करा.. राज्य सरकारने जाहिरातींवर जेवढा खर्च केला तेवढा रक्तपेढी सुसज्ज करण्यासाठी केला तर त्याचा फायदा नक्कीच झाला असता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.