आशिष अंबाडे, चंद्रपूर : येथील ताडाळा इथं दहशत पसरवणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले आहे. कसा रंगला बिबट्याला जेरबंद करण्याचा थरार, हा खास रिपोर्ट.
बिबट्या. सहसा कुणाच्या नजरेस न पडणारा जीव. हाच बिबट्या चंद्रपुरातल्या ताडाळा भागातल्या शेळ्या फस्त करत होता. एका गुराख्यानं शोध सुरु केला असता बिबट्या त्याच्या नजरेस पडला. उमा नदीच्या पात्राशेजारी असलेल्या शेतशिवारात हा बिबट्या ठाण मांडून बसला होता.
बघता बघता ही वार्ता पंचक्रोशीत पसरली. मग काय बिबट्याला बघण्यासाठी हौशे, नवशे आणि गौवशे जमा झाले. एकीकडे बिबट्याला पकण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी रणनिती आखत होते. तर दुसरीकडे उत्साही बघ्यामुळं त्यांच्या ऑपरेशनमध्ये अडथळे येत होते. बघ्यांना आवरण्यासाठी पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला. हे सारं सुरु असताना बिबट्या मात्र झाडीत येरझ-या घालत होता..
सर्व शक्यतांचा विचार करून बेशुद्धीचे इंजेक्शन न देता बिबट्याला त्याला जेरबंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. मग सुरु झालं वनविभाग आणि पोलिसांचं विशेष ऑपरेशन. त्यांनी सापळा रचला. चोहीकडून जाळीनं बिबट्याला घेरलं आणि अखेर बिबट्या जेरबंद झाला.
बिबट्याला चंद्रपूरच्या रामबाग वनशुश्रुषा वाटिकेत पोहोचवण्यात आलंय. मात्र बिबट्याला जेरबंद करण्यात आल्यानं साऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.