औरंगाबाद : औरंगाबाद महापालिका निवडणुकीत अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणात बंडखोरी झालीय. ही बंडखोरी शमवण्याचा प्रयत्न केला जाईल असा विश्वास नेतेमंडळी व्यक्त करतायत.
औरंगाबाद महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा मंगळवारचा अखेरचा दिवस असताना बंडखोरीला प्रचंड ऊत आला. औरंगाबाद शहरातला प्रमुख वार्ड गुलमंडी शिवसेनेला सुटलेला असताना भाजप नेते किशनचंद तनवाणी यांचे भाऊ राजू तनवाणी यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरला. अनेक ठिकाणी शिवसेनेच्या वार्डात भाजप बंडखोरांनी तर भाजपच्या वार्डात शिवसेनेच्या बंडखोरांनी अर्ज भरलेत. सूत्रांच्या माहितीनुसार, आतापर्यंत शिवसेना भाजपमधून जवळपास 20 इच्छूकांनी बंडखोरी केलीय. जागावाटपात शिवसेनेला सुटलेल्या 64 जागांत तब्बल 16 ठिकाणी भाजपच्या बंडखोरांनी अर्ज भरलेत. असं असलं तरीदेखील बंडखोरी शमेल असा विश्वास भाजप नेते किशनचंद तनवाणी यांनी व्यक्त केलाय.
अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांची मोठी धावपळ पहायला मिळाली. सोमवारी संध्याकाळी युतीचा निर्णय झाला तर आघाडी तुटल्याचं अचानक सांगितल्यानं इच्छुक उमेदवारांची चांगलीच कोंडी झाल्याचं पहायला मिळालं.
नाही... हो म्हणता म्हणता शिवसेना-भाजपमध्ये दिलजमाई झाली. मात्र, शिवसेनेच्या वॉर्डात भाजपनं तर भाजपच्या वॉर्डात शिवसेनेनं बंडखोरी केल्यानं अनेक ठिकाणी युतीला फटका बसण्याची शक्यता आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.