मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दुष्काळी दौऱ्यात घोषणांचा पाऊस

सलग तीन दिवस दुष्काळी मराठवाड्याचा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दौरा केला या दौ-यात त्यांनी अनेक घोषणा केल्या.. मराठवाड्याला दिलासा देण्यासाठी प्रसंगी सरकार कर्ज काढून मदत करेल, अशी ग्वाही त्यांनी दिलीय.  मात्र जोपर्यंत घोषीत योजनांनी अंमलबजावणी होत नाही तो पर्यंत मराठवाड्याला काही मिळाले, असे म्हणता येणार नाही अशी चर्चा आहे.

Updated: Sep 4, 2015, 11:27 PM IST
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दुष्काळी दौऱ्यात घोषणांचा पाऊस title=

औरंगाबाद : सलग तीन दिवस दुष्काळी मराठवाड्याचा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दौरा केला या दौ-यात त्यांनी अनेक घोषणा केल्या.. मराठवाड्याला दिलासा देण्यासाठी प्रसंगी सरकार कर्ज काढून मदत करेल, अशी ग्वाही त्यांनी दिलीय.  मात्र जोपर्यंत घोषीत योजनांनी अंमलबजावणी होत नाही तो पर्यंत मराठवाड्याला काही मिळाले, असे म्हणता येणार नाही अशी चर्चा आहे.

वरुणराजानं मराठवाड्यावर पाठ फिरवलेली असताना मुख्यमंत्र्यांनी तीन दिवसांच्या दुष्काळी दौ-यात बळीराजावर घोषणांचा पाऊस पाडलाय. या घोषणांच्या पावसात दुष्काळग्रस्तांची खरंच तहान भागणार की पाण्यासाठी आकाशाकडे जसे डोळे लावून बसले आहेत तसेच राज्यकर्त्यांकडे पाहत बसावे लागणार हा खरा सवाल आहे.  

पिण्याच्या पाण्यासाठी८६ कोटींची तरतूद करण्यात आलीय. पिण्याचं पाणी पुरवण्यासाठी प्रसंगी रेल्वे वाघिणींची मदत घेण्यात येणारेय. पाण्याची गरज भागवण्यासाठी कृष्णा खो-याच्या माध्यमातून सोय करणार. 

येत्या काळात दीड लाख शेततळी निर्माण करणार. शेतात जलसंवर्धनाचं काम केल्यास रोहयोद्वारे शेतक-यांना पैसे देणार. पीक विम्यासाठी वैयक्तीक शेतक-याऐवजी गाव हा निकष ठरवण्याचा विचार असल्याचं सांगितलं.

वैरण विकास कार्यक्रम राबवण्यासाठी पन्नास कोटींची तरतूद, आवश्यकता भासल्यास शेजारच्या राज्यातूनही चारा आणण्याची तयारी दर्शवलीय.चारा छावण्यांसाठी किमान पाचशे जनावरांची अट शिथिल करुन अडीचशेवर आणणं, जनावरांच्या पाण्यासाठी १०टक्के अतिरिक्त तरतूद करण्यात आलीय.

ऊस तोड कामगार, शेतमजूर आणि बीड जिल्ह्यातल्या दोन लाख मजुरांना शंभर दिवसांचा रोजगार दिला जाईल...ज्या शेतक-यांची मुलं बाहेरगावी शिक्षण घेतायत त्यांचे शुल्क शासन भरणार. 

यातल्या अर्ध्याअधिक घोषणा मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच वेगवेगळ्या बैठकांमध्ये केल्या आहेत. केवळ दौ-यावर असल्यानं मुख्यमंत्र्यांनी पुन्हा घोषणांची गर्जना केली. मात्र  त्या दुष्काळग्रस्तांवर बसरणार कधी? 

तीन दिवसांत पाच जिल्ह्यांचा मुख्यमंत्र्यांनी दौरा केला खरा पण शेतक-यांच्या समाधानापेक्षा त्यांच्या रोषालाचा मुख्यमंत्री बळी पडलेत. यावेळीही विरोधकांनी राजकारणाची संधी सोडली नाही.  मुख्यमंत्र्यांचा दौरा म्हणजे निव्वळ पोरखेळ असल्याची टीका करत विरोधकांनीही आपली पोळी भाजली. 

दौ-यावरुन राजकारण आता होतंच राहणार, यात शंका नाही. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या काही घोषणा महत्वाच्या आहेत. मात्र घोषणांची अंमलबजावणी होतच नसल्याचा अनुभव नवा नाही. यावेळी या घोषणांची पूर्तता वेळीच झाली नाही तर पुढच्या काळात दुष्काळग्रस्तांचा उद्रेक झाला तर सरकारला मोठ्या संकटांचा सामना करावा लागणार यात तीळमात्र शंका नाही. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.