डोंबिवली : डोंबिवली हे मराठमोळं शहर आता गुन्हेगारीचं माहेरघर बनत चाललंय. रोजच्या सोनसाखळी चोऱ्या आणि घऱफोड्यांनी नागरिक भयभीत असतानाच भररस्त्यात खून, अल्पवयीन मुलींची छेड, खंडणीखोरीच्या घटनांनी डोंबिवली बदनाम झालंय.
सांस्कृतिक उपनगर ही डोंबिवलीची ओळखच धोक्यात आलीय. गुन्हेगारीचं माहेरघर म्हणून ते बदनाम होऊ लागलंय. रोजच्या रोज सोनसाखळी चोऱ्या, घरफोड्यांनी डोंबिवलीकर भयभीत आहेतच, शिवाय शहरात खंडणीचं सत्र सुरू झाल्यानं स्थानिक नेतेही भयभीत झालेत. त्यातच शहराच्या कायदा सुव्यवस्थेला हादरवणाऱ्या घटना मंगळवारी घडल्या.
भर रस्त्यात तरुणाचा खून...
पांडुरंगवाडी या शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी भररस्त्यात श्रेयस चारी या तरूणाचा खून करण्यात आला. रात्री ३ वाजण्याच्या सुमारास २५ वर्षीय तरुण श्रेयस चारी आणि त्याचा मित्र दशरथ पाटील हे दोघे घराजवळ उभे असता दोघांमध्ये झालेल्या वादातून ही हत्या करण्यात आली असावी, असं प्राथमिक पोलीस चौकशीत समोर येतंय. दोन अज्ञात व्यक्तींनी विटांनी मारहाण करुन पोबारा केल्याचा दावा दशरथनं केलाय. दशरथच्या अंगावरही नखाने ओरबाडल्याचे व्रण आहेत तर त्याच्या डोक्यालाही मार लागलाय. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याचं एसीपी कालिदास सूर्यवंशी यांनी म्हटलंय.
भाजपच्या माजी मंत्र्याच्या पुतण्याला अटक...
त्यातच खंडणीखोरी प्रकरणी मुंबई क्राईम ब्रांचनं भाजपचे माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांच्या पुतण्याला डोंबिवलीत अटक केली. बिपीन पाटील असं त्याचं नाव आहे. रवी पुजारी गँगसाठी खंडणी मागितल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आलीय. बिपीनसह दयानंद जनत उर्फ चड्डी याच्याही पोलिसांनी मुसक्या आवळल्यात.
बिपीन पाटील हा मूळचा डोंबिवलीचा असून तो मद्य व्यावसायिक आहे. बिपीन आणि दयानंद यांनी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक, शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे, मनसे कल्याण जिल्हाध्यक्ष राजू पाटील, बांधकाम व्यावसायिक प्रफुल्ल शहा यांच्यासह ९ जणांचे फोन नंबर, पत्ते आणि मिनिटा मिनिटांचं टाईम टेबल रवी पुजारीच्या शूटर्सना पाठवलं होतं. गेले महिनाभर सुरु असलेल्या धमकी सत्रांतून बिपीन पाटील आणि दयानंद या दोघांनी १८ लाख रुपये परदेशात रवी पुजारीला पोहोचवल्याची माहिती मुंबई क्राईम ब्रांचने दिलीये...
विद्यार्थीनीची छेड... शिपायाला चोपलं
हे कमी झालं म्हणून की काय, आणखी एक धक्कादाय प्रकार डोंबिवलीच्या प्रतिष्ठित टिळकनगर शाळेत घडली. या शाळेचा शिपाई सहावीच्या एका विद्यार्थीनिची कित्येक दिवसांपासून छेड काढत होता. विद्यार्थीनीने हा प्रकार पालकांना सांगितल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी शाळेत जाऊन त्या शिपायाला चोप दिला.
डोंबिवलीतल्या घरफोड्या आणि सोनसाखळी चोऱ्या थांबवण्यात पोलीस साफ कुचकामी ठरलेत. त्यात आता हे नवे प्रकार... डोंबिवलीकरांची सुरक्षा सध्या रामभरोसेच असल्याचं दुर्दैवी चित्र सध्या पाहायला मिळतंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.