पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणात तीन संशयित औरंगाबाद पोलिसांच्या रडारवर आहेत, अशी माहिती पोलिसांच्या खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.
डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड अॅड. गोविंद पानसरे आणि प्रसिद्ध कन्नड साहित्यिक डॉ. कलबुर्गी या सामाजिक कार्यकर्त्यांची हत्या एकाच गटाने घडविल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. त्या अनुषंगाने सीबीआयसह सर्वच तपास यंत्रणा एकवटल्या आहेत.
दरम्यान, अटकेतील संशयित वीरेंद्र तावडे याच्या माहितीची खातरजमा करण्यासाठी कोल्हापुरातील पाच जणांची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात आली. आता या प्रकरणात औरंगाबादेतीलही तीन ते चार संशयितांवर पोलिसांकडून करडी नजर ठेवण्यात आली आहे. त्यांच्या संशयास्पद हालचालींवर तपास यंत्रणाही लक्ष ठेऊन आहेत.
पानसरे, दाभोलकर यांच्या हत्येनंतर औरंगाबादेतील एका तरुणाला सोशल साईटवर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर गेल्या वर्षात कोल्हापूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं. त्याची कसून चौकशीही झाली होती.
वीरेंद्र तावडे, सारंग अकोलकर यांच्याशी संबंधित औरंगाबादेतील व्यक्तींचा या हत्येमागे काही हात असू शकतो काय? तसेच शहरातील व्यक्तीचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य मिळाले काय, अशा सर्व शक्यताही तपास यंत्रणा पडताळून पाहत आहेत.