सांगली: शेती, आरोग्यासह हवामानातील बदल तसंच अतीवृष्टी, गारपीट टाळण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या 'ज्ञानांजली' या रॉकेटचं सांगलीत प्रक्षेपण करण्यात आलं. गुजरातच्या इंटरनॅशनल इंडियन युनिव्हर्सिटी आणि सांगलीच्या एस.बी.जी.आय.च्या वतीनं क्रीडा संकुलाच्या मैदानावर स्पेस टेक्नॉलॉजिचा वापर करून या रॉकेटचं प्रक्षेपण करण्यात आलं.
यासाठी सांगलीतल्या क्रीडा संकुलाच्या मैदानावर बच्चे कंपनी आणि नागरीकांनी मोठी गर्दी केली होती. त्यांच्या कुतुहलाचा विषय होता 'ज्ञानांजली' नावाचं एक छोटसं रॉकेट. या रॅकेटचं प्रेक्षपण इथल्या मैदानावरून करण्यात येणार होतं. ज्ञनांजली रॉकेट द्वारे भूगर्भातील जलसाठा, खनीजसाठा याची अचूक माहिती तर मिळणारच शिवाय गारपीट आणि अतिवृष्टी टाळण्यासाठीही हे रामबाण ठरणार आहे.
या रॉकेटच्या प्रक्षेपणाच्यावेळी थोडासा तणावही निर्माण झाला. कारण ज्या मैदानातून याचं प्रक्षेपण केलं जाणार होतं त्या भागात इंडियन ऑईलचा मोठा डेपो तसंच मानवी वस्तीही होती. त्यामुळं पोलिसांनी या प्रक्षेपणावर हरकत घेतली. मात्र प्रेक्षेपण यशस्वी झाल्यानंतर सारा तणाव टाळ्यांच्या गजरात विरुन गेला.
या रॉकेटचा सर्वाधिक फायदा बळीराजाला होणार आहे. त्यामुळे अशा संशोधनाला आडकाठी न आणता सहकार्य करावं अशी अपेक्षा संशोधकांनी व्यक्त केलीये. आणखी संशोधन करून रॉकेटमध्ये सुधारणा केल्यास जिथं पाऊस नाही अशा भागात कृत्रिम पाऊस पाडता येईल असा विश्वास यावेळी प्राध्यपक किरण नाईक यांनी केला.
विशेष म्हणजे हे रॉकेट साखरेच्या इंधनावर चालणारं आहे. पहिल्या टप्प्यात साडे सातशे मीटरचं अंतर या रॉकेटनं पार केलं. सुमारे 150 विद्यार्थ्यांनी गेले काही दिवस या प्रयोगासाठी दिवस रात्र एक करून संशोधन केलं.
या रॉकेटचं सर्वात मोठं वैशिष्ट्य साखरेपासून तयार केलेलं इंधन आहे. येत्या काही दिवसात संपूर्ण भारतीय बनावटीचं हे रॉकेट साडे चार किलोमीटरचं अंतर पार करेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.