डोंबिवली : कल्याणमधील २७ गावांना कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत समावेश करु नका. ग्रामस्थांच्या संघर्ष समितीला आमचा पाठिंबा आहे. तसेच नवी मुंबईतील दिघा येथील कारवाईला आमचा विरोध आहे, अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली आहे.
कल्याण, डोंबिवली या शहरांचा विचका झालाय. असे असताना आणखी नवीन २७ गावांचा महापालिकेत समावेश कशासाठी? या गावांना सहभागी करुन त्यांचे भले होणार आहे का? त्यामुळे ही गावे स्वतंत्र ठेवलेली बरी, असे मत राज यांनी व्यक्त केले. राज यांनी डोंबिवलीतील पत्रकार परिषदेती आपली भूमिका स्पष्ट केली.
अधिक वाचा : राज ठाकरेंनी घेतलं मोदींवर तोंडसुख
दादरी प्रकरणावरही राज यांनी भाष्य केले. दादरीसारख्या घटना या पद्धतशीर घडवल्या जात आहेत. सत्ता राखण्यासाठी येत्या काळात दंगली घडवल्या जातील आणि कदाचित एखादं छोटं युद्धही छेडलं जाईल, असा आरोप राज ठाकरे यांनी भाजपवर केला आहे.
दिघावासियांच्या पाठिशी
दिघ्यातील नागरिकांची फसवणूक झाली असून, तेथे सुरू असलेली पाडापाडीची कारवाई चुकीची आहे. ज्यांनी सर्वसामान्य नागरिकांना फसविले त्या बिल्डर, प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्यावर कारवाई का केली जात नाही, कॅम्पाकोलासाठी वेगळा आणि दिघ्याला वेगळा न्याय का? असा सवालही राज यांनी उपस्थित केला.
राज यांचा शिवसेनेच्या भूमिकेला पाठिंबा
दरम्यान, शिवसेनेने गुलाम अली यांच्या कार्यक्रमाला केलेल्या विरोधाच्या भूमिकेला राज ठाकरे यांनी पाठिंबा दर्शविला. गुलाम अली खूप मोठे गायक आहेत, त्यात वाद नाही, पण आपल्या देशातही चांगले कलाकार आहेत. पाकिस्तानने नेहमी कुरापती काढायच्या आणि आपण मात्र नेहमी हात पुढे करणार, हे चुकीचं आहे. लता मंगेशकर यांच्यासारख्या ज्येष्ठ गायिकेलाही तिथे कार्यक्रम करू दिला जात नाही, जगजित सिंग यांचा कार्यक्रमही उधळून लावला होता. मग पाकिस्तानचे कशाला कलाकार इथे हवे आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.