बीड: व्यक्ती तितक्या प्रवृत्ती... याच व्यक्तींना कोणतेही छंद असू शकतात. असाच एक छंद जोपासलाय के. पद्मराजन के. कुचुंबा या व्यक्तीनं. त्यांना हौस आहे ती देशातील दिग्गज व्यक्तींविरोधात निवडणूक लढविण्याची.
तमिळनाडूतील नागरिक असलेल्या के. पद्मराजन यांनी आतापर्यंत १५९ निवडणुकींमध्ये अर्ज भरला आहे. आता बीडमधील लोकसभा पोटनिवडणुकीच्या रुपानं १६०व्यांदा अर्ज दाखल केला आहे.
पद्मराजन तमिळनाडूच्या सालेम तालुक्यातील मेत्तुर गावातील रहिवासी आहेत. त्यांनी दुपारी साडेबारा वाजता लोकसभा निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे अर्ज दाखल केला. त्यांनी यापूर्वी लोकसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बडोदा मतदारसंघातून त्यांनी अर्ज दाखल केला होता.
पद्मराजन यांच्या या 'छंदा'ची २००४मध्ये 'ग्रिनीज बुक'मध्ये नोंद करण्यात आली आहे. तत्कालिन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी राज्यसभेसाठी आसाममधून अर्ज दाखल केला होता, त्यावेळी पद्मराजन त्यांच्याविरोधात लढले होते. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी २००४मध्ये लखनऊ मधून लढताना, पद्मराजन यांनीही अर्ज केला होता.
शिवाय, नरसिंह राव, राजशेखर रेड्डी, ए. के. अँटनी, एम. करुणानिधी, जयललिता यांच्याविरोधात त्यांनी अर्ज केला आहे. राष्ट्रपतिपदासाठी प्रणव मुखर्जी यांच्या विरोधातही त्यांनी अर्ज केला होता. गमतीची बाब म्हणजे पद्मराजन स्वत:ची ओळख 'ऑल इंडिया इलेक्शन किंग' या नावानं करून देतात.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.